शेंदुर्णीत आषाढी एकादशीला भरणार भक्तीचा मळा… सर्व यंत्रणा सज्ज…

0

 

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

खान्देशचे प्रति पंढरपुर नगरी असलेल्या क्षेत्र शेंदुर्णीत आषाढी एकादशीला खान्देश मराठवाडा आणि विदर्भातील लाखो भाविक भगवान श्री त्रिविक्रम महाराज यांच्या दर्शनासाठी येतात. भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी मंदिर ट्रस्ट शेंदुर्णी नगरपंचायत आणि पहुर पोलीस सज्ज झाले आहे.

आषाढी एकादशी तीन प्रहरात जर भगवान श्री. त्रिविक्रमाचे दर्शन घेतले तर साक्षात पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन झाल्याचे भाग्य लाभते अशी भाविकांची अपार श्रद्धा असल्याने शेंदुर्णीत आषाढी एकादशीला लाखोंच्या संख्येने भाविक दरवर्षी दर्शनासाठी येतात.

बुधवार रात्री ११ वाजता भगवान श्री. त्रिविक्रमास अभिषेक व महापुजा केली जाते आरती झाल्यावर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाते. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन जामनेरच्या नगराध्यक्षा सौ. साधना महाजन, शेंदुर्णीच्या नगराध्यक्षा सौ.विजया खलसे, अमृत खलसे, शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय गरुड जिल्हा परिषद सदस्या सौ.सरोजिनी गरुड, पाचोरा पिपल्स बँकेचे संचालक पवन अग्रवाल तसेच मान्यवरांच्या हस्ते अभिषेक व पुजा, महाआरती होणार आहे.

मंदिर सजले…

सध्या जुन्या मंदिराच्या आठवणी घेऊन भाविक मंदिरात येतात तेव्हा नवीन मंदिराचा सुसज्ज परिसर रंगरंगोटी पाहुन ते आनंदी होतात फक्त भुयारातुन दर्शन होत नाही याचीच खंत असते. जागोजागी फराळ, चहा, दुध ,केळी वाटप,लाडु वाटप विविध संस्था, पतसंस्था, राजकीय पक्ष,सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक मंडळाच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी मोफत वाटप केले जाते.

नगरपंचायतीच्या वतीने स्वच्छता अभियान..

आषाढी एकादशीला लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांची नगरपंचायतीच्या वतीने काळजी घेतली जात असुन शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, साफसफाई केली जात आहे.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त.।

भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप हे स्वतः आपल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सह लक्ष ठेऊन आहे. बुधवारी शहरातील मुख्य मार्गावरुन पोलिसांनी रुट मार्च काढला होता.यात पोउनि. संजय बनसोड, दिलीप पाटील तसेच पोलीस व होमगार्ड मोठ्या संख्येने उपस्थित होते.भाविकांनी विशेषतः महिलांनी दागदागिने, लहान मुले यांना सांभाळावे अनोळखी ,संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

तरी भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी यावे शांततेत दर्शन घ्यावे असे आवाहन संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे गादीवारस ह.भ.प.शांताराम महाराज भगत, मंदिराचे पुजारी शिरिष देवकर, शेंदुर्णीच्या नगराध्यक्षा सौ.विजया खलसे, उपनगराध्यक्ष गणेश पाटील, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप तसेच ग्रामस्थ शेंदुर्णी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.