लोकशाही न्यूज नेटवर्क
सातारा : तरूणाला ढकललं उकळत्या चुन्यात, तरूण गंभीर जखमी .स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरूणाला त्याच्या मित्रांनीच बेदम मारहाण करून त्याला उकळत्या चुन्यात ढकलल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील रविवार पेठेत आज, गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. यामध्ये संबंधित तरूण भाजून गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी. साताऱ्यातील रविवार पेठेमध्ये चुनाभट्टी असून, या ठिकाणी समाधान मोरे (वय २३) हा राहात आहे. समाधान स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो. गुरुवारी सकाळी त्याची त्याच्या मित्रांसोबत शाब्दिक वादावादी झाली. यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. हा वाद रस्त्यावरच सुरू होता.
मारहाण करत त्याच्या मित्रांनी समाधानला शेजारीच असलेल्या उकळत्या चुन्यात ढकललं. त्यानंतर संबंधित मित्र तेथून पसार झाले. उकळत्या चुन्यात समाधानचे शरीर डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण चुन्याने भरले. चुन्यात भाजला गेल्याने तो गंभीर जखमी झाला.
या प्रकारानंतर काही नागरिकांनी समाधान मोरेला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. समाधानचा त्याच्या मित्रांसोबत नेमक्या कोणत्या कारणातून वाद झाला, हे अद्याप पुढे आले असून, पोलीस समाधानचा जबाब नोंदवत आहेत. त्यानंतरच या मारहाणीचे कारण स्पष्ट होणार आहे.