जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जातिवाद पोसण्याचे काम राजकीय व्यवस्था करीत असून समतावादी साहित्य मंडळ सारख्या संस्था जातीव्यवस्था हद्दपार करण्यात योगदान देऊ शकतात. समतावादी साहित्य शिक्षक मंडळामार्फत आज झालेला 14 पुस्तकांच्या प्रकाशनासारखा सोहळा मी महाराष्ट्रात पाहीला नाही. जळगाव जिल्ह्यातील शिक्षक प्रचंड प्रतिभासंपन्न आहेत आणि आपल्या प्रतिभेचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करीत आहेत, ही अत्यंत भूषणावह बाब आहे.
सदर सोहळा हा प्रकाशनाचा उच्चांक आहे. समतावादी साहित्य शिक्षक मंडळाच्या शिक्षकांनी अशाच प्रकारे समाजप्रबोधनासाठी लेखन करीत राहावे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी 27 मार्च रोजी समतावादी साहित्य शिक्षक मंडळामार्फत आयोजित केलेल्या भव्य पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी केले.
आपल्या मनोगतात डॉक्टर श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, सध्या परिस्थिती अत्यंत भयावह आहे. मानवी मूल्य हरपत चालली आहेत. धर्म राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेला आहे. प्रत्येक विचार धर्माच्या दृष्टिकोनातून पहिला जात आहे. आम्ही हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध व ख्रिश्चन अशा धर्मा-धर्माच्या कंपार्टमेंटचे नागरिक न होता आता आम्हाला वैश्विक नागरिकत्वाची कास धरली पाहिजे. त्यासाठी माणसाने संकुचित वृत्ती सोडली पाहिजे. जातीच्या भिंती ओलांडल्या पाहिजे आणि माणूसपण जपले पाहिजे.
समतावादी साहित्य मंडळाचा सदर कार्यक्रम एस.एस.बी. टी. इंजिनिअरिंग कॉलेज, बांभोरी, जळगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मंचावर डायटचे प्राचार्य डॉक्टर अनिल झोपे, बीएसएनएलचे सेवानिवृत्त अधिकारी मंगल शिरसाठ, राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब विश्वासराव पाटील, प्रशांत पब्लिकेशनचे संचालक प्रदीप पाटील, एरंडोलचे गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील व मंडळाचे अध्यक्ष प्रा. भरत शिरसाठ इत्यादी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम प्रसंगी खालील पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
1. सत्यशोधक आणि इतर कथा
लेखक- प्रा. भरत आ. शिरसाठ- एरंडोल
2. फिमेल कॅरॅक्टर्स इन शोभा डेज नाॅवेल्स
लेखक- प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी- पाचोरा
3. क्रांतीलहर- काव्यसंग्रह
कवी- अजय भामरे- अमळनेर
4. माझी सावित्रीमाई आणि आजची स्री
लेखिका- सौ. रंजना कोळी- बेटावद, जामनेर
5. मुलींचे शिक्षण व महिला सक्षमीकरण
लेखिका- सौ. प्रतिभा पाटील- जळगाव
6. माता रमाई आंबेडकर
वर्षा शिरसाठ- एरंडोल
7. स्वीट मोमेंट्स वीद द एन्जल्स
सौ. सपना रावलानी- जळगाव
8. बालिका की शिक्षा मे शिक्षिकाओंकी भूमिका
– सौ. सरिता वासवानी- भुसावळ
9. समतेचे शिलेदार
शंकर भामेरे-पहूर, जामनेर
10. स्री- पुरुष समानता
श्रीमती वर्षाताई अहिरराव- जळगाव
11. माझे गुरू- माझे कल्पतरू
श्रीमती वर्षाताई अहिरराव- जळगाव
12. बेसिक इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश फनाॅलाॅजी
भारती ठाकरे- शिरसोली, जळगाव
13. इंडिया- बांगलादेश टेलीकोलाबोरेशन प्रोजेक्ट
श्रीमती वर्षाताई अहिरराव- जळगाव
14. इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अमेंडमेंट ॲक्ट
ॲड.ऐश्वर्या आठवले- भुसावळ
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समतावादी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक भरत शिरसाठ यांनी केले. सूत्रसंचालन मंडळाचे कोषाध्यक्ष रणजित सोनवणे, सचिव एस ये पाटील व प्रमोद आठवले यांनी केले. कार्यक्रमाचे आभार मंडळाचे सदस्य संजय बारी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रणजीत सोनवणे, वर्षा अहिरराव, हेमेंद्र सपकाळे, जीवन शिरसाठ, डॉक्टर सैंदाणे, शैलेश शिरसाठ, विनोद सपकाळे व शरद धनगर इत्यादींनी परिश्रम घेतले.