जळगाव जिल्हा मराठी बोली साहित्य संघाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. वासुदेव वले

0

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क
मराठी बोली साहित्य संघ नागपूर या राज्यव्यापी साहित्य संघाच्या नागपूर येथे झालेल्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सभेत जळगाव जिल्हा मराठी बोली साहित्य संघाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. वासुदेव वले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. जळगाव येथील ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. किसन पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जळगाव जिल्हा मराठी बोली साहित्य संघाच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी मराठी बोली साहित्य संघ नागपूर केंद्रीय अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर हे होते.

 

या सभेत बंडोपंत बोढेकर यांनी प्रा. डॉ. वासुदेव वले यांचे नाव सुचित केले आणि कार्यकारणीतील सर्व सदस्यांनी त्यांना अनुमोदन दिले. या सभेला डॉ. हरिश्चंद्र बोरकर, अध्यक्ष मराठी बोली साहित्य संघ नागपूर, हिरामण लांजे, सचिव मराठी बोली साहित्य संघ नागपूर व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. प्रा. डॉ. वासुदेव वले यांनी भुसावळ येथे संपन्न झालेल्या पहिल्या बोली साहित्य संमेलनात सहभाग नोंदविला होता.

नोव्हेंबर – २०१९ मध्ये पाचोरा येथे राज्यस्तरीय बोली साहित्य संमेलनाचे त्यांनी यशस्वीपणे आयोजन केले होते. त्यांनी वऱ्हाडी, अहिराणी, तावडी व लेवा पाटीदारी या बोलींवर संशोधन कार्य केले आहे. त्यांना अध्ययन अध्यापनाचा २७ वर्षाचा अनुभव असून संशोधन क्षेत्रात देखील त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १० विद्यार्थ्यांनी विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी संपादन केली आहे. ते श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथे उपप्राचार्य मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मराठी अभ्यासमंडळाचे सदस्य तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा पाचोराच्या वतीने त्यांनी अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय चर्चासत्रे, संमेलने यशस्वीपणे आयोजित केली आहेत. त्यात समीक्षा संमेलन, बोली साहित्य संमेलन, खानदेशस्तरीय बोली साहित्य संमेलनांचा समावेश आहे. आजही साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष पदावरून साहित्यासाठी त्यांचे योगदान आहे.

यानिमित्त त्यांचा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. आ. दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, मानद सचिव अॅड. महेश देशमुख, व्हा. चेअरमन विलास जोशी, प्राचार्य डॉ. शिरीष पाटील व संस्था परिवाराने त्यांचे अभिनंदन केले. लवकरच जळगाव जिल्हा मराठी बोली साहित्य संघाची कार्यकारणी जाहीर करण्यात येईल असे प्रा. डॉ. वासुदेव वले यांनी सांगितले.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.