झेंडा ले लो, दो दिनसे भुखा हूँ साहब

0

प्रजासत्ताक दिन विशेष लेख

आजच्या २१ व्या शतकात तसेच संगणकीय युगात भारत या कृषिप्रधान देशाने जरी प्रत्येक क्षेत्रात प्रगती केलेली असली तरी आजही भारत देशातील काना-कोपऱ्यातील लहान मुले शिक्षणापासून वंचित असल्यामुळे निरक्षर तर आहेतच, त्याच बरोबर ते बालमजुरी करुन त्यांच्या स्वतःबरोबरच त्यांचे आई-वडील व लहान भावंडांचे पोटे भरत आहेत. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे २६ जानेवारी व १५ आॅगस्टच्या पूर्वसंध्येला व २६ जानेवारी व १५ आॅगस्टच्या दिवशी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी प्लास्टीक पासून बनविलेले , कागदांपासून बनविलेले ध्वज विक्री करतांना आपण प्रत्येक ठिकाणी बघतो. तसेच गरिबीमुळे अशी मुले शाळेत जाऊ शकत नाहीत. परिणामी त्यांना शाळेतील ध्वजावंदनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावता येत नाही.

त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी लहान मुले कोणतीही कष्टाची कामे करतांना आपल्या नेहमीच निर्दशनास येत असतात. यामुळेच भारत या कृषिप्रधान देशात बालमजुरीचे रोपटे रोवले गेले व आज त्या रोपट्याचे महावृक्षात रुपांतर झालेले आहे. अशा या लहान मुलांच्या खेळण्या-बागडण्याच्या व शालेय शिक्षण घेण्याच्या वयात त्यांना कष्टाची कामे करावी लागतात. आपल्या या मागासलेल्या समाज व्यवस्थेमुळे देशाचे भवितव्य अंधकारमय झालेले व धोक्यात तसेच अडचणीत सापडलेले आहे. कारण आजच्या तरुण पिढीवरच तर संपूर्ण भारत देशाचे भवितव्य अवलंबून आहे. परंतु हिच मुले अशिक्षित, निरक्षर व अज्ञानी राहीली तर देशाचे भविष्यही अंधकारमयच होईल. आज केवळ बालहक्कांबाबत कागदोपत्री गवगवा न करता प्रत्यक्ष त्या संदर्भात उपाय योजना करुन बालमजुरीला आळा घालणे ही काळाची गरज आहे.

भारत या देशात कुपोषित बालकांची संख्या ही वाढलेली आहे. त्यांना व त्यांच्या आईला त्यांच्या जन्माच्या वेळेस चांगला पौष्टिक आहार मिळालेला नसतो म्हणून आज त्यांना कुपोषित बनुन आपले अमूल्य, अनमोल जीवन कंठावे लागत आहे. परिणामी त्यांच्यावर मृत्यू देखील ओढवत आहे.

अशाच प्रकारची अज्ञान, अशिक्षित, निरक्षर व कुपोषित बालके भारत देशात कमी न होता त्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे व अशाच प्रकारची मुले राहिले तर भारत देशाचे माजी राष्ट्रपती कै. डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांनी बघितलेले “भारत महासत्ता” हे स्वप्न प्रत्यक्षात न उतरता ते त्यांचे स्वप्न हे स्वप्नच राहुन जाईल. यामुळे लहान मुलांकडून बालमजुरी न करवता त्यांना शिक्षणाला प्रोत्साहन देऊन त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करु दिले तर निश्चितच “भारत महासत्ता” देश बनेल व “झेंडा ले लो, दो दिनसे भुखा हूँ साहब ” हे वाक्य नष्ट होऊन त्याजागी “हम होंगे कामयाब एक दिन” हे वाक्य तयार होईल, यात तिळमात्र शंका नाही.

 

-हेमंत वसंतराव चौधरी, 

चाळीसगाव, जि. जळगाव. 

मो. नं. :- ९८९०७०३४८५.

Leave A Reply

Your email address will not be published.