जळगावात भव्य श्रीराम मंदिर उभारण्यास जैन उद्योगाचे संपूर्ण सहकार्य

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

विशेष प्रतिनिधी जळगाव

जुने जळगाव मधील राम मंदिराला 125 वर्षाचा इतिहास आहे. रामाच्या पदस्पर्शाने पवित्र झालेले जळगावातील राम मंदिर आता जुने झाले आहे. त्यासाठी नवीन जागा मिळवून नव्या जागेत भव्य असे राम मंदिराच्या उभारणीसाठी मंदिर संस्थांचे गादीपती मंगेश महाराज यांच्याशी बोलणी करून नवे मंदिर उभारण्यासाठी जैन उद्योग समूहाच्या वतीने संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांनी काल भरगच्च पत्रकार परिषदेत पत्रकारांची संवाद साधताना दिली.

22 जानेवारी रोजी अयोध्या येथे पार पडलेल्या श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर या सोहळ्याचे साक्षीदार म्हणून अशोक भाऊ जैन यांनी जैन हिल्सवर आयोजित भव्य पत्रकार परिषद आपले अनुभव कथन केले. जळगाव जिल्ह्यातील पाच लाख भाविकांचे प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य मला लाभले त्याबद्दल अशोक भाऊंनी कृतज्ञता व्यक्त केली. जळगाव जिल्ह्यातून सात निमंत्रितांपैकी अशोक भाऊ हे एक निमंत्रित होते.

अयोध्या येथे राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे नियोजन आणि प्रयोजन भव्यदिव्य असे होते. सुरक्षा व्यवस्थेचे सुरक्षारक्षक सुद्धा साध्या वेशात वावरत होते. मंदिर संयोजकांनी केलेल्या व्यवस्थेने सर्वच निमंत्रित भारावून गेले. धार्मिक, अध्यात्मिक पावित्र्य मंदिर परिसरात पूर्णपणे जपले गेले होते. अगदी स्वतःच्या पायातील पादत्राणे सुद्धा निमंत्रितांना स्वतःच्या हाताने काढू दिले नाही. त्यासाठी सेवक त्यांची पादत्राने काढून पॉलिथिन पिशवीत ठेवत आणि त्याचा नंबर आपल्या हातात द्यायचे. मी माझ्या पायातील बूट काढण्यासाठी वाकून बोटाला हात लावला तर सेवेकरांनी माझा हात पकडला. त्यांनी माझे बूट काढले. त्यानंतर माझ्या हातावर जंतूनाशक टाकून हात धुतले. मंदिरात प्रवेश करताना नियम पूर्ण पाळले गेले हे विशेष होय. या व्यवस्थेने सर्वच भाविक निमंत्रितांचे मन थक्क झाले होते, असे अशोक भाऊ जैन यांनी सांगितले.

अवघी ७० हजार लोकसंख्या असलेल्या आयोध्या शहराला नव्या नवरी सारखे रूप आले होते. सर्वत्र दिवाळी सणाचा आनंद साजरा होत होता. विमानतळापासून राम मंदिरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने स्वागत होत होते. शिस्तबद्ध रित्या उभारलेले स्वागत फलक मन आकर्षित करत होते. मंदिराच्या प्रवेशद्वारात होणाऱ्या स्वागतानंतर एकदा मंदिरात प्रवेश केल्यानंतर तेथे कसलाही दुजाभाव अथवा उच्च निच अशी वागणूक न देता सर्व भाविक एकसमान वावरत होते. सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी मंदिरात स्थानापन्न झाल्यापासून दुपारी ३ वाजता सोहळा संपेपर्यंत अनेक वेळा चहा नाश्ता यांची बडदास्त करण्यात आली. दुपारचे जेवण जागेवरच मिळाले. पंतप्रधानांचे भाषण संपल्यानंतर पहिल्या दिवशी ७ हजार भाविकांना राम लल्लाचे दर्शन घेण्याचा लाभ आणि भाग्य मिळाले. त्यापैकी मी एक भाग्यवान होतो, अशी भावना अशोक भाऊंनी व्यक्त केली.

तब्बल एक तासभर अशोक भाऊंनी आपले अनुभव सांगत त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. जैन इरिगेशनच्या वतीने अयोध्या मंदिर परिसरात सध्या ठिबक सिंचन आदी सेवा दिली जात आहे. परंतु अयोध्येत कायमस्वरूपी जैन इरिगेशनचे कार्यालय उभारण्याचा मानस सुद्धा अशोक भाऊंनी बोलून दाखवला.

 

पद्मालय मंदिराच्या जीर्णोद्धाराला गती देणार

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे असलेल्या सुप्रसिद्ध गणपती मंदिराला महाराष्ट्र शासनातर्फे ब वर्गाचा दर्जा मिळाला आहे. शासन आणि पर्यटन विभाग यांच्यातर्फे एकूण दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. मंदिराचे ट्रस्टी या नात्याने पद्मालय येथील उजव्या आणि डाव्या सोंडेच्या एकमेव गणपती मंदिराच्या जीर्णोद्धार करण्यासाठी २५ कोटी रुपयांची योजना तयार केली आहे. देणगी रूपाने मिळालेले पावणेदोन कोटी रुपये शिल्लक आहेत. देणगी देण्यासाठी देणगीदार तयार आहेत. बारा एकर परिसरात भव्य उद्यान, लग्न समारंभासाठी सभागृह आणि भाविकांच्या मुक्कामासाठी चांगल्या सुविधा असलेल्या निवासस्थाने तसेच मंदिरापर्यंत जाण्यासाठी चांगल्या रस्ता तयार करून ही त्या तीन वर्षात ते पूर्णत्वास येईल. त्याला एक महत्त्वपूर्ण मंदिर म्हणून संपूर्ण भारतभरात त्याची ख्याती होईल, हा संकल्प एक ट्रस्टी म्हणून पूर्ण करायचा असल्याची माहिती अशोक भाऊंनी दिली.

जिल्ह्यातील कारसेवकांचा मेळावा घेणार

योध्येतील राम मंदिर उभारण्यात अनेकांचा सहभाग आहे, तसा देशभरातील कारसेवकांचाही सहभाग आहे. काही कारसेवक अशोक भाऊंना भेटले. १९९२ च्या कार सेवेत सहभागी झाल्याचे त्यांना सांगितले. जिल्ह्यातील अनेक कारसेवकांचे परिश्रम या राम मंदिराला लाभले असल्याने जिल्ह्यातील कार सेवकांचा एकत्रित मिळावा आयोजित करण्याची सूचना पत्रकार परिषदेत करण्यात आली. तेव्हा क्षणाचा विलंबही न लावता लवकरच कार सेवकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्याचे अशोक भाऊंनी मान्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.