कर्ज महागणार ! RBI ने रेपो दरात केली वाढ

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पुन्हा कर्ज महागणार आहे. आरबीआयने रेपो दरात (RBI Hike Repo Rate) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या (RBI) पतधोरण आढावा बैठकीत 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

ही व्याज दरवाढ तात्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचे आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास (Reserve Bank Governor Shaktikanta Das) यांनी सांगितले. आरबीआयच्या या निर्णयामुळे रेपो दर 5.40 टक्क्यांवर गेला आहे.

आरबीआयने रेपो दरात वाढ केल्याने गृह कर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक, कार कर्ज महागणार आहे. व्याज दर वाढवल्याने बाजारातील खरेदीवर नियंत्रण येते. त्याच्या परिणामी मागणी आणि पुरवठ्याचे व्यस्त झालेले प्रमाण काही प्रमाणात संतुलित होते. त्यामुळे महागाईला आळा बसण्यास काही प्रमाणात मदत होते.

याआधी आरबीआयने मे 2022 मध्ये झालेल्या मॉनिटरी पॉलिसी (MPC) बैठकीनंतर रेपो दरात 40 बेसिस पॉईंटची वाढ केली होती. त्यानंतर रेपो दर 4.40 टक्के झाला. त्यानंतर 8 जून 2022 मध्ये झालेल्या बैठकीनंतर रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर रेपो दर 4.90 टक्के इतका झाला. आरबीआयने एकाच महिन्यात जवळपास 90 बेसिस पॉईंटची वाढ केली होती.

रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास (Reserve Bank Governor Shaktikanta Das) यांनी पत्रकार परिषद घेत मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पतधोरण आढावा बैठकीतील निर्णय सांगितले. शक्तिकांत दास यांनी सांगितले की, वर्ष 2022-23 मध्ये भारताचा जीडीपी 7.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे. हा अंदाज आरबीआयने याआधीच वर्तवला होता. सध्या जागतिकीकरण आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा दबाव असल्याचे दिसून येत असल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले. भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होत आहे. देशातील महागाईच्या मुद्यावर चिंता कायम असल्याचेही त्यांनी सांगितले. आरबीआयने रेपो दरात वाढ करण्यासह एसडीएफच्या दरात वाढ केली आहे. एसडीएफ दर 5.15 टक्के असणार आहे. याआधी एसडीएफ दर 4.65 टक्के होता.

 रेपो रेट म्हणजे काय?

रेपो रेट (Repo rate) म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?

रिव्हर्स रेपो रेट (Reverse Repo Rate) म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

Leave A Reply

Your email address will not be published.