भाजपाचा ‘युवा चेहरा’ शरद पवारांच्या संपर्कात?

आमदार रोहित पवारांचा पुढाकार ; रावेरसाठी लेवा उमेदवाराचा शोध

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

रावेर लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी नव्या उमेदवाराचा शोध घेत असून भाजपाचा ‘युवा चेहरा’ शरद पवार यांच्या संपर्कात असून उमेदवारी मिळविण्यासाठी या युवा नेत्याची धडपड सुरु झाली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यासाठी पुढाकार घेत असून लेवा समाजाचा उमेदवार देण्यावर राष्ट्रवादी भर देत आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपतर्फे विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपमधील काही युवा चेहऱ्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. भाजपमधील या नाराजवीरांना मंत्री गिरीश महाजन यांनी समज देवून शांत केले असले तरी पडद्यामागे मोठी घडामोड घडत आहे. रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवरुन भाजपमध्ये जाहीर नाराजीनाट्य रंगल्याने रक्षा खडसे यांची उमेदवारी धोक्यात येईल असे चिन्ह होते; परंतु भाजप श्रेष्ठींनी रक्षा खडसे यांची पाठराखण करीत उमेदवारी कायम ठेवल्याने हे युवा कार्यकर्ते कमालीचे संतप्त झाले असून ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी जवळीक साधून आहेत. राष्ट्रवादीने रावेर लोकसभा मतदारसंघासाठी अद्यापही उमेदवाराची घोषणा केली नसल्याने ते नव्या उमेदवाराच्या शोधात असल्याचे स्पष्टच आहे. या मतदारसंघात लेवा, मराठा आणि मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणावर असून सामाजिक गोळा-बेरीज साधण्यावरही शरद पवारांची राष्ट्रवादी भर देत आहे.

रोहित पवारांचा पुढाकार

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार हे भाजपमधील या ‘युवा चेहऱ्या’ला गळाला लावण्यासाठी प्रयत्न करीत असून जिल्ह्यातील एक वरिष्ठ पदाधिकारी देखील त्यासाठी मुंबईत वाऱ्या करीत आहे. भाजपच्या या युवा चेहऱ्यासोबत रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे.

कोण आहे युवा चेहरा ?

भाजपमधील हा युवा चेहरा रक्षा खडसे यांच्या उमेदवारीमुळे प्रचंड संतापला असून  तो राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे कळते. हा युवा चेहरा कोण याची चर्चा होत असली तरी राजकीय विश्लेषकांसमोर या युवा नेत्याचा चेहरा समोर आहे. या युवा  चेहऱ्याला राष्ट्रवादीकडून संधी मिळाली तर लढत काटे की होणार हे नक्की!

Leave A Reply

Your email address will not be published.