लोकशाही न्यूज नेटवर्क
रावेर येथील ग्रामीण रुग्णालय हे महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांच्या सीमावर्ती भागात असून आदिवासी बहुल भागात सेवा देण्यासाठी उभारण्यात आले आहे. अनेक वर्षापासून सदर रुग्णालय हे गोरगरिबांची अत्यावश्यक सेवादेत होते. परंतु काही वर्षांपासून या रुग्णालयाला ग्रहण लागले असून, याठिकाणी कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. एन.डी. महाजन हे कार्यरत आहेत. त्यांच्या कारभाराची सखोल चौकशी करण्यासाठी त्रीसदस्य समिती नेमावी अशी मागणी रावेर येथील आमरण उपोषणास बसलेल्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
याबाबत अधिकारी वृत्त असे की, रावेर येथील पदभार स्वीकारल्यापासून डॉ. एन.डी. महाजन यांनी रावेर ग्रामीण रुग्णालयातील सर्व अत्यावश्यक सुविधा बंद करण्याचा ध्यास धरला होता. या ठिकाणी होणारे बाळंतपणे, अवघड शस्त्रक्रिया, सिजर आदींसारखे महत्त्वाचे शस्त्रक्रिया यांनी बंदच करून टाकलेले आहेत. दररोज त्यांनी कर्तव्यावर येणे आवश्यक असताना, “मी ओपीडी काढण्यासाठी नाही किंवा रुग्ण तपासणी करणे हे माझे काम नाही. मी फक्त वैद्यकीय अधीक्षक आहे. अशा अविर्भावात राहून कुठलीही सेवा बजावत नाहीत. रावेर आणि पाल ग्रामीण रुग्णालय दोघांचा पदभार त्यांच्याकडे असून, दोन्हीपैकी एकाही ठिकाणी ते नियमित उपस्थित नसतात. रावेर आणि पाल ग्रामीण रुग्णालय हे केवळ रेफर सेंटर बनले आहे. कोरोनाच्या कालावधीत देखील यांनी अत्यंत मनमानीपणे कारभार केलेला असून, महाजन यांनी रावेर येथील पदभार स्वीकारल्यापासून ते आज त्यांच्या सर्व कारभाराची सखोल चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावरती निलंबन अथवा बडतर्फ यासारखी कारवाई होणे अपेक्षित आहे. सदर चौकशीही त्रीसदस्य समितीद्वारा करण्यात यावी. अशी उपोषणार्थी यांची प्रमुख मागणी असून, या समितीमध्ये महसूल विभागाचे अधिकारी आरोग्य विभागाचे अधिकारी व संबंधित सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त समितीद्वारे चौकशी होऊन कार्यवाही व्हावी ही प्रमुख मागणी आहे.
चौकशी पूर्ण पर्यंत महाजन यांचा पदभार काढण्यात यावा. कार्यालयीन कामकाजात त्यांचा हस्तक्षेप होऊन महत्त्वाची कागदपत्रे व रेकॉर्ड गायब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून त्यांचा पदभार या ठिकाणाहून काढण्यात येऊन इतरत अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात यावा. गेल्या तीन दिवसांपासून रावेर येथे साखळी उपोषण करीत आहेत व आज (दि. 28) पासून आमरण उपोषण पुकारण्यात आले आहे. गोरगरिबांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाचे निराकरण लवकर न झाल्यास आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये पूर्ववत सुविधा उपलब्ध न झाल्यास निळे निशान संघटना अधिक तीव्र आंदोलन छेडेल. रावेर शहर आधीच संवेदनशील असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून तात्काळ त्रिसदस्य समितीद्वारे सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती केली आहे.
रावेर येथे उपोषण स्थळी सहा जिल्हाधिकारी देवयानी यादव यांनी भेट देवून आनंद बाविस्कर व कार्यकर्ते यांना लवकरच यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी त्यांचे सोबत तहसीलदार बंडू कापसे, नायब तहसीलदार संजय तायडे, सहा गट विकास अधिकारी फेगडे आदी उपस्थित होते. तर या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी देखील डॉ महाजन यांच्या विरुद्ध तक्रारीचा पाढाच कथन केला.