खाद्यसंस्कृती विशेष
नवरात्रीचे नऊ दिवस आणि नऊ व्रत अखंड भारतात केले जाते. विविध स्वरूपात नवदुर्गांचे आपणास दर्शन होत असते. महाराष्ट्रातील संपूर्ण वातावरण तर जगदंबेचा उदोउदो करण्यात भक्तीमय झालेला पहायला मिळतो. आपल्याकडे नवरात्रीचे नऊ दिवस देवीची आराधना, उपासना करताना सर्वजण देवीच्या नऊ दिवस व्रताचे पालन करतात. या नऊ दिवसांच्या व्रतात काहीजण फक्त कंद आणि फळ खातात आणि त्यामुळे रोज गोड खाल्लेही जात नाही. याचसाठी आज आपण उपवासाचा तिखट फराळ बनवणार आहोत. पाहूया तर मग कमी साहित्यात झटपट रताळ्याचे काप आणि रताळ्याचा किस..
रताळ्याचे काप
साहित्य: रताळी, मीठ आणि तूप
कृती:
१. रताळ्याचे साल काढून त्याचे काप करावे.
२. ते काप स्वच्छ धुवून थोडावेळ पाण्यात ठेवावे.
३. तव्यावर तुप टाकून एक एक काप चांगले खरपूस तळून घ्यावेत.
४. तळलेल्या रताळ्याच्या कापांवर मीठ भुरभरावे.
५. कुरकुरीत काप लगेच खाल्यास अगदी मस्त लागतात.
रताळ्याचा किस
साहित्य: रताळी, तूप, मिरची, जिरे, ओलं खोबरं, चवीपुरतं मीठ आणि साखर
कृती:
१. रताळी स्वच्छ धुवून त्याचा किस करून घ्या.
२. एका कढईत तूप गरम करून मिरची आणि जिऱ्याची फोडणी द्या.
३. त्यात किसलेलं रताळं टाका. वरून चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर साखर टाकून चांगलं परतून घ्या.
४. ओलं खोबरं पेरून वाफेवर किस शिजवून घ्या.
५. उपवासासाठी गरमागरम रताळ्याचा किस मस्त लागतो.
नक्की करून पहा….
अपर्णा स्वप्निल कांबळे – नांगरे
पत्रकार/फुड ब्लॉगर
९८९२१३८१३२