शालेय पुस्तकांमध्ये रामायण, महाभारत यांचा समावेश करावा; NCERT पॅनेलची शिफारस…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

NCERT च्या पॅनेलने म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने भारतीय महाकाव्ये रामायण आणि महाभारत शाळांमध्ये शिकविण्याची शिफारस केली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, प्रा. सीआय इसाक म्हणाले की, पॅनेलने सर्व वर्गखोल्यांच्या भिंतींवर स्थानिक भाषांमध्ये संविधानाची प्रस्तावना लिहावी, अशी शिफारसही केली आहे. एनसीईआरटीच्या सामाजिक विज्ञान समितीने, शाळांसाठी सामाजिक विज्ञान अभ्यासक्रम सुधारित करण्यासाठी, भारतीय ज्ञान प्रणाली, वेद आणि आयुर्वेद यांचा पुस्तकांमध्ये समावेश करण्यासह अनेक प्रस्ताव दिले आहेत.

‘इतिहासाची चार कालखंडात विभागणी करण्याची शिफारस’

इतिहासाचे एक निवृत्त प्राध्यापक म्हणाले, “पॅनेलने इतिहासाचे चार कालखंडात वर्गीकरण करण्याची शिफारस केली आहे: शास्त्रीय कालखंड, मध्ययुगीन काळ, ब्रिटीश काळ आणि आधुनिक भारत. आत्तापर्यंत, भारतीय इतिहासाचे तीनच वर्गीकरण केले गेले आहे – प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारत. ” ते पुढे म्हणाले, “शास्त्रीय कालखंडात, आम्ही शिफारस केली आहे की भारतीय महाकाव्ये – रामायण आणि महाभारत – शिकवले जावेत. आम्ही शिफारस केली आहे की विद्यार्थ्यांना राम कोण होता आणि त्याचा उद्देश काय होता हे जाणून घ्यावे.”

‘पुस्तकांमध्ये सुभाषचंद्र बोस सारख्या नायकांची माहिती असावी’

पाठ्यपुस्तकांमध्ये एक किंवा दोन ऐवजी भारतावर राज्य करणाऱ्या सर्व राजघराण्यांचा समावेश असावा, असा प्रस्तावही समितीने मांडला आहे. इसाक म्हणाले की, पॅनेलने सुचवले आहे की पुस्तकात सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या वीरांची आणि त्यांच्या विजयांची माहिती असावी. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांना भारतीय वीर, त्यांचे संघर्ष आणि विजयांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल.” ते पुढे म्हणाले, “आम्ही असेही सुचवले आहे की सर्व वर्गखोल्यांच्या भिंतींवर प्रास्ताविक स्थानिक भाषेत लिहावे.”

‘पाठ्यपुस्तकांमध्ये इंडिया या शब्दाऐवजी भारत हे नाव असावे’

पाठ्यपुस्तकांमध्ये इंडिया या नावाच्या जागी भारत हा शब्द असावा, असा प्रस्तावही समितीने दिला आहे. यावर एनसीईआरटीने गेल्या महिन्यात सांगितले होते की, अभ्यासक्रम विकासाची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. एनसीईआरटीने म्हटले आहे की, “संबंधित विषयावर मीडिया रिपोर्ट्सवर भाष्य करणे घाईचे आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.