राजेंद्र गावितांचा शिंदेंना रामराम,भाजपात घरवापसी

देवेंद्र फडणवीसांनी सांगितले कारण

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क 

पालघर लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट झाला. पालघरची जागा भाजपला गेली, आणि त्या जागेवरुन पक्षाने हेमंत सवरा यांना रिंगणात उतरवले. मात्र ॲडजस्टमेंट म्हणून पाच वर्षांपूर्वी शिवसेनेत पाठवलेला आपला मोहरा भाजपने परत मागून घेतला आहे. राजेंद्र गावित यांचा भाजपमध्ये पुनर्प्रवेश झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत गावितांनी भाजपचा झेंडा पुन्हा खांद्यावर घेतला. पत्रकार परिषद घेत फडणवीसांनी यासंदर्भात घोषणा केली.

मध्यंतरी स्थित्यंतरे झाली, त्यात एकनाथ शिंदेंसोबत राजेंद्र गावित राहिले. 2024 साली पालघरची ही जागा पुन्हा भाजपला मिळाली. मात्र पक्षाचा निर्णय झाला, की राजेंद्र गावित यांचा उपयोग महाराष्ट्रात अधिक आहे. मंत्री-आमदार म्हणून त्यांना कामाचा अनुभव आहे, पक्षाला राज्यात त्यांचा जितका उपयोग आहे, तेवढा कदाचित दिल्लीत होणार नाही. कारण महाराष्ट्रात त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे, त्यांना प्रशासनाची माहिती आहे, असेही फडणवीसांनी सांगितले. आम्ही राजेंद्र गावितांशी चर्चा केली, त्यांचा होकार आला, त्यांच्या संमतीनेच आम्ही उमेदवार बदलला, हेमंत सवरा यांना तिकीट दिले. तांत्रिकदृष्ट्या ते शिवसेनेत असल्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांना सांगितले, की आम्हाला गावितांना परत घ्यायचे आहे, शिंदेंनीही संमती दिली, कारण त्यांना जुना इतिहास माहिती होता. त्यानुसार गावितांचा पुनर्प्रवेश होत आहे, असे फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

राजेंद्र गावित यांचा भारतीय जनता पक्षात पुनर्प्रवेश झाला आहे. 2018 मध्ये पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत ते विजयी झाले. 2019 मध्ये भाजपची शिवसेनेशी युती झाली, मात्र सेनेनेची पालघर देण्याची अट ठेवली होती. आम्हाला उमेदवारासह जागा द्या, असे त्यांनी सांगितले. तेव्हा आम्ही गावितांना विनंती केली, त्यांनीही ती मान्य केली, त्यांनी पक्षांतर केले आणि शिवसेनेकडून खासदार म्हणून निवडून आले, असे देवेंद्र फडणवीस सांगत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.