पावसाळी आजार व उपचार

0

लोकशाही विशेष लेख

कधी रिमझिम तर कधी मुसळधार पाऊस पडत असतो. त्यामुळे सगळीकडे आल्हाददायक वातावरण झालेले असते, परंतु सूर्यनारायणाचे दर्शन होत नाही. आरोग्याच्या दृष्टीने सूर्य प्रकाशाचे खूप महत्व आहे. सूर्य प्रकाश नसेल तर वेगवेगळ्या रोगजंतूंची जोमाने वाढ होते आणि रोगराई पसरते.

१) विषाणूजन्य ताप, व्हायरल फिवर, स्वाइन फ्लू इ. खरंतर व्हायरल इन्फेक्शन होऊ नयेत म्हणून प्रतिकार शक्ती उत्तम असावी. ताप आल्यावर किंवा तापाची लक्षणे दिसू लागल्यावर जसे अंगदुखी, कसकस इ. म्हणून असे लक्षणे दिसू लागल्यास लंघन करावे, गरम पाणी प्यावे, सुंठ घालून उकळलेले पाणी प्यावे, फळांचा ताजा रस, भाज्यांचे सूप, मुगाची खिचडी, साळीच्या लाह्या असा आहार घ्यावा. तसेच तापासाठी रसपाचक, महासुदर्शन काढा, सूतशेखर,त्रिभुवनकिर्ती अशी औषधे डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावी.

२) डासांमुळे होणारे डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया हे आजार होतात म्हणून डासांचा प्रतिबंध करावा. घरात धूपन करावे. पूर्ण विश्रांती घ्यावी. शारीरिक हालचाल करु नये. १०० किंवा त्यापेक्षा जास्त ताप असल्यास डाॅक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावे.

३) सर्दी, कफ, खोकला वातावरणातील बदलामुळे अनेकांना या ऋतूत हे त्रास हमखास होतात. यासाठी सर्दी खोकला यांची लक्षणे जसे घसा खवखवणे शिंका येणे इ. दिसू लागताच उपचार सुरू करावेत. गरम पाण्यात मीठ व हळद घालून गुळण्या कराव्या. सुंठ, गवती चहा,आले, लवंग, दालचिनी, पिंपळी, मिरे यांचा काढा करून प्यावा. रात्री झोपताना वाफ घ्यावी. ओली हळद मधात उगाळून तसेच सितोपलादी चूर्णाचे मधासह चाटण घ्यावे. लहान मुलांना बऱ्याचदा खूप कफ होतो व ढास लागते. अशावेळी छातीला तेलात थोडे सैंधव घालून गरम करून मसाज करावा आणि नंतर लसूण व ओव्याच्या पुरचुंडी ने शेकवावे.

४) अपचन, अॅसिडीटी, गॅसेस, जुलाब, उलटी असे आजार होतात. पावसाळ्यात पचनशक्ती कमी झालेली असते त्यामुळे हे त्रास होतात. गरम पाणी प्यावे. सुंठीचा काढा घ्यावा. जेवणापुर्वी आले, सैंधव, जिरेपूड, हिंग, लिंबू रस खावे. पुदिन्याची चटणी आहारात ठेवावी. हलका व सुपचा आहार घ्यावा. पाणी उकळूनच प्यावे. जुलाब झाल्यास लगेच थांबवू नये मात्र शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही याकडे लक्ष ठेवावे. कुटजारिष्ट, संजीवनी वटी, लघुसूतशेखर यासारखी औषधे डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावी. जुलाबाबरोबर उलटी ही होत असेल तर लगेच डाॅक्टरांकडे जावे.

५) सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी इ. हा वातप्रकोपाचा काळ असतो म्हणून सगळी दुखणी वाताचे आजार डोके वर काढतात. यासाठी अंगाला तेल लावून मसाज करावा आणि स्वेदन घ्यावे किंवा गरम पाण्याने अंघोळ करावी. रात्री झोपताना एरंडेल तेलात चिमूटभर हिंग घालून गरम पाण्यासह प्यावे. सांध्यांवर सूज असल्यास आल्याचा रस लावून विटेने किंवा वाळूने शेकवावे. आयुर्वेदातील बस्ती कर्म वैद्यांच्या सल्ल्यानुसार करून घ्यावे. कोणतेही दुखणे अंगावर काढू नये, स्वतःच्या मनाने औषधे घेवू नये, डाॅक्टरांकडे जावे.

डॉ. लीना बोरुडे
आयुर्वेदाचार्य पंचकर्म व वैद्यक योग तज्ञ
आंतरराष्ट्रीय योग तज्ञ
आयुष योग तज्ञ
फोन 9511805298

Leave A Reply

Your email address will not be published.