बारव पुनरुज्जीवनासाठी लोकसहभाग आवश्यक : पंकज शिंदे

0
चोपडा | प्रतिनिधी
प्राचीन काळापासून जलव्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असणाऱ्या,पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या बारवांच्या पुनरुज्जीवनासाठी तरुणांनी एकत्र यावे व लोकसहभागातून बारव संवर्धन करावे असे आवाहन स्थानिक इतिहास अभ्यासक व प्रताप विद्या मंदिर,चोपडाचे इतिहास शिक्षक पंकज शिंदे यांनी केले आहे.
        ‘टीम एक्सप्लोर खान्देश’च्या माध्यमातून अहिल्यापुर येथील पाच मजली बारव संवर्धन कार्यक्रमात ते बोलत होते.खान्देशातील दडलेला इतिहास जिवंत ठेवण्यासाठी,सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी तरुणांनी पुढे यावे व या विधायक कार्यात सहभाग नोंदवून आपले कर्तृत्व सिद्ध करावे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी ‘टीम एक्सप्लोर खान्देशचे संस्थापक प्रशांत वर्मा,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून गौरविलेले महाराष्ट्र बारव मोहीमचे अध्यक्ष रोहन काळे,होळकर घराण्याचे अभ्यासक व इतिहास संशोधक रामभाऊ लांडे व नवयुवक मित्र मंडळ अहिल्यापुर यांच्या परिश्रमातून अहिल्यापुर येथील बारव संवर्धन करणे,स्वच्छ करणे,गाळ काढणे, जनजागृती करणे यासाठी भव्य कार्यक्रम संपन्न झाला. बारव संवर्धनाविषयी लोकसहभाग वाढवण्यासाठी यावेळी लेझर शो आयोजित करण्यात आला होता.
         इतिहास संशोधक रामभाऊ लांडे यांनी यावेळी अहिल्याबाई होळकर यांचे कार्य व त्यांचा इतिहास आपल्या व्याख्यानातून उलगडला. मन की बात मधून पंतप्रधानांनी ज्यांचा उल्लेख केला ते महाराष्ट्र बारव मोहिमेचे अध्यक्ष रोहन काळे यांनीदेखील बारव संवर्धन करण्यासाठी आवाहन केले.गावातून अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पालखी सोहळा व सजीव देखावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी डोळे दिपवून टाकणाऱ्या बारव मधील लेझर शोने ग्रामस्थांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
     कार्यक्रम यशस्वीतेसाठी टीम एक्सप्लोर खान्देशचे अध्यक्ष प्रशांत वर्मा,अहिल्यापुर येथील जयपाल राजपूत, तुषार धनगर, अहिल्यापुर नवयुवक मंडळाचे सर्व सदस्य,सरपंच, ग्रामस्थ,व युवकांनी परीश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.