प्रकाश केऱ्हाळकर – सामाजिक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश केऱ्हाळकर यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रात व्रतस्थ भावनेने कार्य करणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. प्रसिद्धीपासून दूर राहून तात्विक विचारसरणीने सामाजिक बांधिलकी जोपासणारे जे मोजके कार्यकर्ते असतात त्या पैकी ते एक होते. भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून त्यांनी कामगारांच्या समस्यांना वाचा फोडण्यासोबतच कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी पडमोड करण्यासाठी कधीही कमतरता दाखवली नाही.

श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी व उदयराव पटवर्धन यांच्या संपर्कातून त्यांच्याच विचारांनी प्रेरित झालेल्या कामगार संघटनांचे जाळे त्यांनी आयुध निर्माण, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, भारतीय डाक विभाग, नगरपालिका, विंध्य पेपर मिल या सारख्या अनेक संस्थांमध्ये उभारले कामगारांसाठी कायम संघर्ष करताना त्यांनी कधीही आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही. वेळ काळ याचे भान न ठेवता कायम कामगारांच्या हाकेला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा नावलौकिक होता.

सामाजिक बांधिलकी जोपासताना त्यांनी गरीब महिलांच्या सोबत आपली भाऊबीज साजरी करण्याचा उपक्रम त्यांनी शेवटपर्यंत पाळला. अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. त्यांच्या मार्गदर्शन सर्वसमावेशक व व्यापक समाजहित समोर ठेवून केलेले असे वेळप्रसंगी त्यासाठी प्रत्यक्ष मदत करण्याची त्यांची धडपड ही व्यक्तिगत पातळीच्या पलीकडची होती. भुसावळच्या ब्राम्हण संघाचे सचिव म्हणून त्यांच्या काळात संस्थेने साधलेली प्रगती आजही याची साक्षी आहे. त्यांच्या जाण्याने समाजमनाची आपरमित हानी झाली, त्यांचा प्रसिध्दीपासून दूर राहून व्रतस्थ काम करीत राहण्याचा वसा पुढे चालविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल..

प्रा. नितीन मटकरी
विष्णू नगर जळगाव
९३२६७७८३२९

Leave A Reply

Your email address will not be published.