एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क;
एरंडोल तालुक्यात सुकेश्वर या तीर्थशेत्राजवळ जळगाव येथिल सर्पमित्र जगदीश बैरागी हे गिरणा नदी पात्रात ५ मार्च रोजी स्वछता मोहीम राबवीत असताना त्यांना पोषण आहाराची ४००० पाकीटे आढळून आली. विशेष हे की काही पाकीटे नदी पत्रातील खडकावर तर काही पाकीटे काठावर व पाण्यात तरंगताना आढळून आली, त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. घटने बाबत एकात्मिक बालविकास विभागाला कळविण्यात आल्यावर महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्चना धमोरे यानी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
सदर आढळून आलेली पाकीटे ही एकात्मिक बाल विकास विभागातर्फे आंगणवाड्यांमार्फत कुपोषण निर्मूलनासाठी बालकांना व गरोदर महिलांना वितरित केली जातात. खास बाब म्हणजे ही पाकीटे मुदत संपण्याच्या आत नदीपात्रात फेकण्यामागे काय गौडबंगाल आहे, या बाबत परिसरात उलट सुलट चर्चा आहे.
जगदीश बैरागी हे गिरणा नदी पात्र साफ करीत असताना त्यांना पाकीटे सापडली असता आधी त्यांना सदर पाकीटे ही प्लॅस्टिकची असावी असे वाटले, परंतु बारकाईने निरीक्षण केल्यावर ती पोषण आहाराची पाकीटे असल्याची दिसले.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाकीटे कोणी फेकली? का फेकली? याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. कुपोषण दुर करण्यासाठी शासन पाण्यासारखा पैसा खर्च करीत असताना अन्नाची पाकीटे गिरणा नदी पात्रात फेकण्याचे पाप हे शासन व प्रशासनाच्या डोळ्यात धुळ फेकण्याचा प्रकार असल्याचे जाणकारांचे मत आहे.