गडचिरोलीच्या संवेदनशील भागात पहिल्यांदा बसवले गणपती- पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे

0

आठवणीतील गणपती 

सन 2006 मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून मी पोलीस खात्यात रुजू झालो. माझी पहिली पोस्टिंग ही ऑगस्ट २००७ मध्ये महाराष्ट्रातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील जीमलगट्ट या पोलीस स्टेशनला झाली होती. या भागात अत्यंत संवेदनशील असं वातावरण आहे. गडचिरोली म्हटलं म्हणजे ही परिस्थिती असतेच. या गावात माझी पोस्टिंग होती. तिथे नागरिकांचा पोलिसांशी काही एक संबंध नव्हता. त्यामुळे पुढील प्रक्रिया कशी राबवावी, हे फार मोठे आव्हान होतं. मात्र तिथल्या नागरिकांना विश्वासात घेऊन मी त्या गावात गणेशोत्सवाची सुरुवात केली. हा त्या गावातील पहिला एकमेव असा गणेशोत्सव ठरला. याआधी त्या ठिकाणी गणपती बसवले जात नव्हते. मात्र नागरिकांनी एकत्र यावं, त्यांच्या मनात पोलिसांबद्दल एक आत्मियता निर्माण व्हावी, या उद्देशाने मी हा सर्वात पहिला नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा विचार केला होता. ही आठवण माझ्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणारी अशी आहे.

कारण ज्या गावात पोलिसांशी नागरिकांचा काही एक संबंध नव्हता अशा गावात मी सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र केलं होतं. विशेष म्हणजे तिथे आम्ही नाविन्यपूर्ण उपक्रम देखील साजरे केले होते. लहान मुलांसाठी विविध उपक्रम घेऊन त्यांचा उत्साह वाढवला. यामुळे कमी वेळात नागरिकांशी चांगले संबंध निर्माण झाले आणि हे गणेशोत्सवामुळे शक्य झालं, अशी आठवण शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी लोकशाहीच्या कार्यालयात आरतीच्या वेळी कथन केली.

दैनिक लोकशाहीच्या कार्यालयात दरवर्षीप्रमाणे शहरातील उच्चपदस्थ व्यक्तींच्या हातून श्री गणरायाची सायंकाळची आरती करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये काल आरतीला शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी आपल्या आठवणीतील गणपती बद्दल माहिती सांगितली.

पुढे बोलताना ते म्हणाले, माझी दुसरी आठवण ही जळगाव शहरातील आहे. तेव्हा माझी पोस्टिंग एमआयडीसी पोलीस स्टेशनला होती. यावेळी गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक चालू होती. इच्छादेवी, डी मार्ट पासून मेहरून पर्यंत ही विसर्जनाची मिरवणूक निघते. दरम्यानच्या काळात एका मंडळाने अति उत्साहात येऊन जास्त जल्लोष केला होता. यामुळे डी मार्ट च्या परिसरात काहीशी शांतता भंग झाली होती. हा उत्साह काही लोकांना आवडला नाही. त्यामुळे या ठिकाणी दगडफेक झाली आणि यात मूर्तीची विटंबना देखील झाली. मात्र आम्ही प्रचंड प्रसंगावधान राखून हा अति संवेदनशील मुद्दा त्यावेळी अत्यंत बारकाईने हाताळून ते प्रकरण चिघळणार नाही याची दक्षता घेतली होती. त्यावेळी आमचं संपूर्ण पोलीस बळ त्या कामी प्रयत्न घेत होतं. वास्तविक याचे पडसाद फार मोठे झाले असते. मात्र प्रसंगीच आम्ही घेतलेल्या दक्षतेमुळे पुढला अनर्थ टाळता आला. हा अनुभव माझ्यासाठी फार वेगळा असा होता. मात्र अशा प्रकारची परिस्थिती सांभाळण्याची अनुभूती मला त्यावेळी आली. जी मला माझ्या पुढील पोलीस सेवेच्या कार्यात महत्त्वाची ठरणार आहे, अशी आठवण त्यांनी सांगितली.

यावेळी पोलीस निरीक्षक धारबळे यांनी नागरिकांनाही सर्व सण उत्सव हे शांततेत आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील अशा अनुषंगाने साजरे करण्याचे आवाहन केले आहे. सोबतच सर्व मंडळांना देखील आवाहन केले आहे की, मिरवणुकीत उपस्थित असलेल्या प्रत्येक मंडळाला आपल्या कलाकृतींचं सादरीकरण करण्याची संधी मिळावी. या अनुषंगाने वेळेचे बंधन स्वतःला घालून यावर्षी विसर्जनाची मिरवणूक साजरी करावी, जेणेकरून कुठल्याही मंडळाला नाराजी पत्करावी लागणार नाही याची दक्षता घ्यावी.

रंगनाथ धारबळे, पोलीस निरीक्षक,

शनिपेठ पोलीस स्टेशन, जळगाव.

शब्दांकन : राहुल पवार 

Leave A Reply

Your email address will not be published.