‘…तर याद राखा’!, तिकीट वाटपानंतर मोदींकडून ताकीद

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींकडून खासदारांची शाळा घेण्यात आली असून  ‘याद राखा’ अशा शब्दात ताकीद देत उमेदवारांची कानउघाडणी केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर देशातील राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत असतानाच भाजपने सर्वतोपरी प्रयत्न करत यंदाच्या निवडणुकीत बहुमत मिळवण्यासाठीची तयारी सुरु केली आहे. आतापर्यंत भाजपने निवडणुकीसाठी 398 खासदारांची यादी जाहीर केली असून, यंदा सर्वात मोठा उलटफेर घडवून आणला आहे. पक्षाकडून यावेळी 94 विद्यमान खासदारांना नव्या पर्वासाठी संधी देण्यात आली नसून, नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. (निवृत्त) जनरल वी.के. सिंह, अश्विनी कुमार चौबे यांचेही नाव उमेदवार यादीतून वगळण्यात आलेले आहे. सध्या खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, अमित शाह पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात येणाऱ्या अखेरच्या यादीत लक्ष घालत असतानाच पक्षातील खासदारांना आणि इतर कार्यकर्त्यांना सक्तीची ताकीद देण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींकडून मिळाली ताकीद 

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही काळात पक्षातील खासदारांची दोनदा भेट घेतली. दोन्ही भेटींमध्ये त्यांनी देशातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये केंद्र सरकारच्या योजनांसंदर्भात जनजागृती करण्याची जबाबदारी सोपवली. इतकेच नव्हे, तर कोणत्याही वादग्रस्त वक्तव्यासह कोणत्याही घटनेपासूनही दुरावा पत्करण्याचे आवाहन त्यांनी खासदारांना केले. पक्षाला अडचणीत आणणारे कोणतेही वक्तव्य करू नका अशी सक्त ताकीदच त्यांनी खासदारांना दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.