पिस्तूल वापरतांना निष्काळजीपणा भोवला ; निवृत्त पोलिस निरीक्षकाला दोन वर्षांची शिक्षा

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

वडिलांच्या अंत्यविधीच्या वेळी स्मशानभूमीत तत्कालीन पोलिस निरीक्षकाने त्यांच्याकडील पिस्तूलमधून दोन गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून एकाने हे पिस्तूल घेऊन फायरिंग करण्याच्या प्रयत्नात एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या निष्काळजीपणाबद्दल न्यायालयाने निवृत्त पोलिस निरीक्षकाला दोन वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

घटना अशी की, ११ मे २०१९ रोजी विठ्ठल आवण मोहकर (पोलिस निरीक्षक) हे वडिलांच्या अंत्यविधीसाठी पिंप्री (ता. धरणगाव) येथे गेले होते. त्यांनी त्यांच्याकडे परवाना असलेल्या पिस्तुलातून संध्याकाळी ५ ते ५.१५ वाजेच्या दरम्यान अंत्यविधी सुरू असताना आकाशात दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांच्या हातातून मुलगा दीपक मोहकर याने पिस्तूल घेऊन फायर करण्याचा प्रयत्न करत असताना अंत्ययात्रेला आलेल्या गर्दीमधील तुकाराम वना बडगुजर (वय ६५, रा. पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा) यांच्या छातीत गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मृताचा मुलगा राजू बडगुजर यांनी विठ्ठल मोहकर व त्यांचा मुलगा दीपक यांच्या विरुद्ध धरणगाव पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०४ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता.

हा खटला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. पवार यांच्या न्यायालयासमोर चालला. त्यात सरकारतर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी पाच सरकारी कर्मचारी वगळता उर्वरित नऊ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाले. साक्षीदार अल्ताफ निजाम पठाण (तलाठी), अंबादास शांताराम मोरे (तपासी अधिकारी), तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, गंभीर आनंदा शिंदे (दाखल अंमलदार), एच. एल. गायकवाड यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. या खटल्या कामी सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता रमाकांत सोनवणे यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी हर्षवर्धन सपकाळे यांनी सहकार्य केले.

सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक विठ्ठल मोहकर यांना भादंवि कलम ३०४ अ नुसार २ वर्ष सश्रम कारावास व २ हजार रूपयांचा दंड तर भारतीय शस्त्र अधिनियमाचे कलम ३० नुसार ६ महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तर दीपक मोहकर याला सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.