पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन

0

दुबई , लोकशाही न्युज नेटवर्क

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचे निधन झाले असून ते प्रदीर्घ काळ आजारपणामुळे त्रस्त होते. त्यांनी वयाच्या 79 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या प्रकृती आणखी खालावली असल्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे. 2016 पासून त्यांच्यावर दुबईमध्ये उपचार सुरु होते.

कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानची आगळीक जनरल मुशर्रफ यांच्याकडून करण्यात आली होती. माजी निवृत्त जनरल परवेज मुशर्रफ यांनी लष्करप्रमुख असताना बंड करून पाकिस्तानची सत्ता मिळवली. मुशर्रफ यांनी संविधान भंग करुन 3 नोव्हेंबर 2007 रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर डिसेंबर 2013 मध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता.

परवेज मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी राष्ट्राध्यक्षांना अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील विशेष न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठानं फाशीची शिक्षा सुनावली होती.

दरम्यान, पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा लाहोर उच्च न्यायालयाने रद्द करण्याचा निर्णय दिला होता. देशद्रोहाच्या आरोपात इस्लामाबादच्या विशेष न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली होती. विशेष न्यायालयाने दिलेला निर्णय असंवैधानिक असल्याचं लाहोर उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. मुशर्रफ यांनी त्यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेला लाहोर उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिलं होतं.

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.