पारोळ्यातील गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई

0

पारोळा : पारोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा समाधान लोटन चौधरी (वय ३४) याच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे १४ गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून त्याची कोल्हापूर कारागृहात रवानगी केल्याचे त्यांनी सांगितले.

या संदर्भात पो.नि. सुनील पवार म्हणाले की, समाधान चौधरी हा अवैध मद्य विक्री, गावठी दारू बनवणे, चोरी, फसवणूक, अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणे, स्फोटक सोबत बाळगणे, हाणामारी अशा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी होता. यामुळे पारोळा पोलिसांनी त्याच्यावर स्थानबद्धेचा प्रस्ताव तयार करुन तो जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठवला होता. हा प्रस्ताव एम. राजकुमार यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना पाठवला होता. त्यावर निर्णय होऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार समाधान चौधरी याच्यावर स्थानबद्धेची कारवाई करण्यात आली. त्याची कोल्हापूर येथील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती आज पो. नि. सुनील पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पोलीस उपनिरीक्षक राजू यादव, पो.कॉ. किशोर भोई यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.