सिहोर मध्ये चेंगराचेंगरी ;२ हजार भाविक रुग्णालयात दाखल

0

सिहोर, लोकशाही न्यूज नेटवर्क

पंडित प्रदीप मिश्रा (Pradeep Mishra) यांनी सांगितल्याप्रमाणे मध्य प्रदेशातील सिहोर (Sehore) येथे मोफत रुद्राक्ष वाटण्यात येणार होते. रुद्राक्ष उत्सव सुरू होण्याच्या एक दिवस आधी मध्य प्रदेशातील सिहोरजवळील कुबेरेश्वर धाम येथे जमलेल्या प्रचंड जनसमुदायापुढे यंत्रणा हतबल झाली. रुद्राक्षासाठी एक ते दीड किलोमीटर लांबीची रांग लागली होती. या रांगेत महाराष्ट्रातील (Maharashtra) भाविकांसह विविध राज्यांतील 2 लाखांहून अधिक जण होते. ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी बांबू व लाकडांचे बॅरिकेड्स लावण्यात आले. पण त्यानंतरही गर्दी नियंत्रणात आली नाही.

अनेकदा चेंगराचेंगरीसारख्या घटना घडल्या. प्रत्येक वेळी रांग पुढे सरकली की महिला आणि वृद्धांमध्ये लोटालोटी होत असे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 2 हजारांहून अधिक लोक येथील प्राथमिक उपचार केंद्रात पोहोचले होते. या गर्दीच्या गडबडीत बहुतेकजण घाबरले होते. अनेकांना उलट्या झाल्या. तर बहुतेक जखमी झाले.

2 लाखांहून अधिक लोक जमले असताना प्रशासनाची मोठी दमछाक झाली. एक दिवस आधी रुद्राक्ष वाटप सुरू केल्यास गर्दी हाताळता येईल, असे त्यांनी रुद्राक्ष वितरण समितीला सांगितले. रुद्राक्ष वाटपही नियोजित वेळेच्या एक दिवस आधी सुरू झाले, मात्र एवढी गर्दी हाताळण्यासाठी केलेली व्यवस्था अपुरी दिसून आली.

Leave A Reply

Your email address will not be published.