राजकीय उलथापालथ :पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी केली संसद बरखास्त

0

इस्लामाबाद ;- पाकिस्तानमध्ये मध्यरात्री राजकीय उलथापालथ झाली आहे. संपूर्ण देश साखरझोपेत असताना पाकिस्तानची संसद राष्ट्रपतींनी बरखास्त केली आहे.

 

पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी ही कार्यवाही केली असून यामुळे पंतप्रधानांचाही कार्यकाळ आता संपुष्टात आला आहे. संसदेचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या तीन दिवस आधीच संसद बरखास्त करण्यात आल्याने आता येथे काळजीवाहू पंतप्रधानांची नेमणूक करण्यात येणार आहे.

संसदेच्या पाच वर्षांचा कार्यकाळ १२ ऑगस्ट रोजी संपणार होता. त्यानंतर, सार्वत्रिक निवडणुका पाकिस्तानात घेण्यात येणार होत्या. परंतु, कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच संसद बरखास्त करण्यात आल्याने निवडणुका होईपर्यंत देशावर नियंत्रण ठेवण्याकरता काळजीवाहू प्रशासनाची निवड केली जाणार आहे. तसंच, येत्या ९० दिवसांत निवडणुका घेता याव्यात याकरता संसदेत विरोधी पक्षनेताही निवडला जाणार आहे.

अल्वी यांच्या भूमिकेमुळे सरकार घाबरले

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्ताधारी पक्षाने 11 ऑगस्ट रोजी नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्याची शिफारस केल्यास, राष्ट्रपती आरिफ अल्वी वेळेच्या कमतरतेच्या कारणास्तव कनिष्ठ सभागृह बरखास्त करण्याची अधिसूचना ताबडतोब जारी करतील, अशी भीती होती. आरिफ अल्वी हे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे माजी नेते आहेत, ज्यांना राष्ट्रपती होण्यापूर्वी तुरुंगवास भोगावा लागला होता. अशा स्थितीत त्यांच्या या भूमिकेबाबत सरकार घाबरले होते.

राष्ट्रपतींकडे 2 पर्याय होते

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बुधवारी रात्री उशिरा राष्ट्रपती अल्वी यांना नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्यासाठी पत्र पाठवून काळजीवाहू पंतप्रधान नियुक्तीची प्रक्रिया औपचारिकपणे सुरु केली, असे जिओ न्यूजच्या वृत्तात म्हटले आहे. यानंतर राष्ट्रपती अल्वी यांच्याकडे 2 पर्याय उरले होते. ते एकतर नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्यासाठी ताबडतोब अधिसूचना जारी करु शकतात किंवा 48 तासांसाठी विलंब करु शकतात. त्यांनी पहिला पर्याय निवडला आणि नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्याचा आदेश जारी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.