पाकिस्तानमध्ये मंदिरात मूर्तीची तोडफोड; पुजाऱ्यावर हल्ला

0

कराची, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पाकिस्तानमधील कराची शहरातील एका हिंदू मंदिरातदेवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आलीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी कराची कोरंगी भागातील श्री मारी माता मंदिरात देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली. कोरंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘जे’ परिसरात हे मंदिर आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मंदिराची पाहणी करून या प्रकरणाची चौकशी केली.

‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’ या वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेमुळं हिंदू समाजातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विशेषत: कोरंगी भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या परिसरात राहणारे हिंदू संजीव यांनी वृत्तपत्राला सांगितलं की, मोटारसायकलवरून आलेल्या सहा ते आठ जणांनी मंदिरावर हल्ला केला. हा हल्ला कोणी केला आणि का केला हे आम्हाला माहीत नाही, असं ते म्हणाले.

कोरंगीचे एसएचओ फारुख संजरानी म्हणाले, “पाच ते सहा अज्ञात संशयितांनी मंदिरात प्रवेश केला आणि मंदिराची तोडफोड करून पळ काढला.” पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू लोकसंख्येच्या मंदिरांना अनेकदा जमावाकडून लक्ष्य करत आहेत. ऑक्टोबरमध्ये कोटरी येथील सिंधू नदीच्या काठावर असलेल्या एका ऐतिहासिक मंदिराला अज्ञात व्यक्तींनी लक्ष्य केलं होतं. याप्रकरणी कोटरी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अधिकृत अंदाजानुसार, पाकिस्तानमध्ये 7.5 दशलक्ष हिंदू राहतात. मात्र, समाजानुसार देशात 90 लाखांहून अधिक हिंदू आहेत. पाकिस्तानातील बहुतांश हिंदू लोकसंख्या सिंध प्रांतात स्थायिक आहे. ते अनेकदा अतिरेक्यांकडून छळ होत असल्याची तक्रार करतात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.