पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
जामनेर तालुक्यातील गोंद्री येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्री घरात दरोडा टाकत वृध्द महिलेचा गळा दाबून खून करून तिच्या अंगावरील सोन्याचे व चांदीचे दानिगे लांबविल्याची घटना उघडकीस आलीय. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
जामनेर तालुक्यातील गोद्री येथील रहीवाशी मानबाबाई सरदार तडवी (वय ८५) ह्या घरात एकटी राहतात. त्यांच्या भागात त्यांचा मुलगा व सुन वेगळे राहतात. दरम्यान, २१ जून रोजी सायंकाळी जेवण करून मानबाबाई झोपल्या होत्या. मध्यरात्री संशयित आरोपी बब्बू सांडू तडवी (वय २७, रा. भारूडखेडा पहूर ता. जामनेर) याने मध्यरात्री येवून वृध्द महिला झोपलेली असता तिचा गळा दाबून खून केला आणि अंगावारील सोन्याचे बाळ्या, चांदीच्या पाटल्या असा एकुण ३२ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी मयत मानबाबाई यांच्या सुन शेनफडाबाई बलदार तडवी यांनी पहूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून संशयित आरोपी बब्बू सांडू तडवी याच्या विरोधात दरोडा आणि खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संशयित आरोपी बब्बू सांडू तडवी याला ताब्यात घेतले आहे.