गुवाहाटी, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर ठाकरे सरकार धोक्यात आलं आहे. शिंदे आणि सर्व बंडखोर आमदार गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये आहेत. दरम्यान येथे शिवसेनेचे सातारा उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांना गुवाहाटी पोलिसांकडून अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
शिवसेनेवरील नितांत प्रेमापोटी शिवसेनेचे साताऱ्याचे उपजिल्हाप्रमुख व कट्टर शिवसैनिक संजय भोसले हे थेट गुवाहाटीत पोहचले. त्यांनी हाॅटेल रॅडिसन ब्ल्यू येथे जावून बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना उध्दव ठाकरेंकडे परत येण्याचं आवाहन केलं आहे. गुवाहाटी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असून यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत अस्वस्थ निर्माण झाली असून महाविकास आघाडी सरकारही कोसळण्याच्या वाटेवर आहे. एकनाथ शिंदेंवर टीका करणारे व त्यांचे समर्थन करणारे असे दोन गट निर्माण झाले आहेत. या सगळ्या गदारोळात एकनाथ शिंदे यांना परत आणण्यासाठी माण तालुक्यातील बिजवडी गावचे रहिवाशी व साताऱ्याचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले थेट गुवाहाटीत पोहोचलेत. एकनाथ शिंदे ज्या रेडिसन ब्ल्यू हॉटेलात थांबले आहेत, त्याच हॉटेलबाहेर संजय भोसले पोहोचले असून ‘साहेब मातोश्रीवर परत चला’ अशी आर्त साद त्यांनी एकनाथ शिंदेंना घातली आहे.
संजय भोसले यांनी आपल्या गळ्यात एक पाटी लावली असून त्यांनी एकनाथ शिंदेंना भावनिक आवाहन केलं आहे. “शिवनसेना जिंदाबाद ! एकनाथ शिंदे (भाई) मातोश्रीवर परत चला, उद्धवजी आणि आदित्यजींना साथ द्या” असा मजकूर यावर लिहिलेला आहे. दरम्यान, हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या संजय भोसले यांना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, या घटनेमुळे खळबळ माजली असून सर्वत्र संजय भोसले यांच्या नावाची चर्चा आहे.
बिजवडी (ता. माण) येथील संजय भोसले यांनी अतिशय तरुण वयात शिवसैनिक म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यानंतर शाखाप्रमुख, विभागप्रमुख, माण तालुकाप्रमुख व आता सातारा उपजिल्हाप्रमुख म्हणून ते काम पाहत आहेत. सडेतोड भूमिका घेवून कोणालाही शिंगावर घेण्याची त्यांची तयारी असते. आजचे त्यांचे आंदोलन सुध्दा असेच असून ते गुवाहाटीत गेल्याची साधी कुणकुण सुध्दा शिवसैनिकांना नव्हती. या आंदोलनामुळे संजय भोसले चर्चेत आले आहेत.