पाचोऱ्यात एकाच रात्री तीन दुकाने फोडली

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क 

पाचोरा शहरातील जामनेर रोडवरील कै. सुपडु भादु शाॅपिंग काॅम्प्लेक्समध्ये शुक्रवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास शितल प्रोव्हीजन, सेवा मेडिकल व त्र्यंबक गरबड वाणी या तीन दुकानांमध्ये धाडसी चोरीचा प्रयत्न झाला. दुकानांचे शटरचे कुलुप टामीच्या साहाय्याने तोडुन चोरट्यांनी आत प्रवेश केला. यात ७ हजार २०० रुपये रोख रक्कम लंपास करुन शितल प्रोव्हीजन मधील दोन सीसीटीव्ही कॅमैऱ्यांची तोडफोड करुन सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे १२ हजार रुपयांचे नुकसान करुन अज्ञात चोरटे पसार झाले आहेत.

पाचोरा येथील कै. सुपडु भादु शाॅपिंग काॅम्प्लेक्समधील शितल प्रोव्हीजनचे मालक रमेश लक्ष्मण वाणी हे दि. ११ ऑगस्ट रोजी रात्री ८:३० वाजता दुकान बंद करून घरी गेले होते.  दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता शेजारील दुकानदार रमेश अग्रवाल हे त्यांचे दुकानात आल्यानंतर त्यांनी रमेश वाणी यांना फोन करुन तुम्ही दुकान बंद करण्याचे विसरले काय ? अशी विचारणा केली असता रमेश वाणी हे आश्चर्यचकित होवुन त्यांनी दुकानाच रस्ता धरला असता दुकानाचे शटर उघडलेल्या अवस्थेत आढळून आले. व दुकानातील ५०० रुपयांची चिल्लर ड्रावर मधुन गायब झालेली दिसली. दुकानात बसविलेले दोन सीसीटीव्ही कॅमेरे तोडफोड करुन त्यांचे १२ हजार रुपयांचे नुकसान झाले.

मात्र त्यांच्या दुकानातील एक सीसीटीव्ही कॅमेरा सुरू असल्याने त्यात दोन अज्ञात चोरटे चोरी करत असतांनाच सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. त्यांचे जवळ असलेले सेवा मेडिकलचे संचालक विशाल ब्राह्मणकर यांच्या दुकानाचे शटरचे कुलुप टामीच्या साहाय्याने तोडुन ५०० रुपयांची चिल्लरची चोरी झाली. तसेच त्र्यंबक गरबड वाणी या किराणा दुकानाचे संचालक मिलिंद पुंडलिक वाणी यांचे दुकान फोडुन दुकानातील ६ हजार रुपये चोरी करण्यास अज्ञात चोरटे यशस्वी झाले आहे‌.

त्याला लागुनच असलेल्या राम फोटो स्टुडिओ हे दुकान देखील चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला असता दुकानास मध्यवर्ती लाॅक असल्याने ते लाॅक तोडण्यात चोरटे अयशस्वी झाले. फोडलेल्या दुकानांची कुलप जवळच असलेल्या कचरा कुंडीत टाकुन अज्ञात चोरटे पसार झाले.  घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, पोलिस काॅन्स्टेबल विनोद बेलदार, गजानन काळे, योगेश पाटील यांनी भेट देऊन घटनाक्रम जाणुन घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.