विविध मागण्यांसंदर्भात शुभांगी पाटील यांचे अंबादास दानवे यांना निवेदन

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

राज्यातील खाजगी शाळांना देण्यात येणाऱ्या वेतनेतर अनुदान व जुनी पेन्शन लागू करण्यात यावी यासह शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या) उत्तर महाराष्ट्र महिला संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी पाटील यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेऊन सदरचे मुद्दे सदनात लक्षवेधी द्वारे मांडण्यासंदर्भात निवेदन दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने राज्यात मागील दोन वर्षांपासून शाळांना वेतनेतर अनुदान दिले जात नाही व जे वेतनेतर अनुदान लागू आहे ते देखील पाचव्या वेतन आयोगाच्या वेतनानुसार केवळ ५ टक्के देण्यात येते. सध्या शिक्षकांचे पगार सातव्या वेतन आयोगानुसार होत असतांना पाचव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनेतर अनुदान देणे हे अन्यायकारक असून वेतनेतर अनुदान आज देखील केवळ पाच टक्के दिले जाते ते पाच टक्क्यावरून १२ टक्क्यावर करण्यात यावे. त्याचप्रमाणे राज्यभरामध्ये जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरलेले असतांना देखील आज ७ दिवस आला असून देखील सरकारला त्याच्याशी सोयर सुतक नाही. अशा परिस्थितीत विरोधी पक्ष म्हणून सदरचे मुद्दे प्रबळपणे सदनात मांडले जावे.

राज्यातील शिक्षकांचे देखील विविध प्रश्न प्रलंबित आहेत, ज्यामध्ये नुकताच विनाअनुदानित शिक्षकांच्या संदर्भात काढण्यात आलेला २०, ४०, ६० टक्केचा शासन निर्णय व त्यामधील जाचक अटी या शिक्षक व संस्थाचालक कधीही पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे सदरच्या अटी रद्द करण्यात याव्यात तसेच जिल्हा परिषद शिक्षकांच्या दरवर्षी विनाकारण बदल्या करण्यात येतात. या बदल्या जर शिक्षकाने ऐच्छिक मागणी केली असेल तरच त्यांच्या बदल्या करण्यात याव्या, तसेच जर एखाद्या शिक्षकाविषयी तक्रार असेल तर त्याची योग्य ती शहानिशा करून मगच त्यांच्या बदल्या करण्यात याव्यात. राज्यातील ७८ विनाअनुदानित सिनियर कॉलेज देखील अनुदानापासून वंचित आहेत. त्या सिनियर कॉलेजला देखील अनुदान मिळावे यासाठी आपण विरोधी पक्षनेते म्हणून प्रखरपणे लक्षवेधी लावून संस्था चालकांचे व शिक्षकांचे वरील सर्व प्रश्न मार्गी लावावे अशा आशयाचे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उत्तर महाराष्ट्र महिला संपर्कप्रमुख शुभांगी पाटील यांनी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना दिले असून लवकरच या बाबतीत सदनात आवाज उठवला जाईल असे आश्वासन विरोधी पक्षनेत्यांनी दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.