गळफास लावून विवाहितेची आत्महत्या, घातपाताचा नातेवाईकांचा संशय

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क 

तालुक्यातील बाळद येथे राहत्या घरात २२ वर्षीय विवाहितेचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. विवाहितेचा घातपात झाला असल्याचा संशय विवाहितेच्या नातेवाईकांनी करत ग्रामीण रुग्णालय परिसरात एकच आक्रोश केला होता. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनचे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आमडदे ता. भडगाव येथील निकीता हिचा विवाह गेल्या तीन वर्षांपुर्वी बाळद ता. पाचोरा येथील अनिल पवार याचेशी झाला होता. लग्नानंतर अनिल हा नियमित दारु पिऊन निकीता हिचा शारिरीक व मानसिक छळ करीत होता. निकीता हिस सासरच्या मंडळींकडून वारंवार टोचुन बोलणे सुरुच होते. दरम्यान ११ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता निकीता हिचा राहत्या घराच्या छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, पोलिस हवालदार विनोद पाटील, सहाय्यक फौजदार निवृत्ती मोरे, पोलिस नाईक अमोल पाटील, मनोहर पाटील, पो. काॅं. दिनेश पाटील व कमलेश पाटील हे रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या सहघटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा पंचनामा केला. निकीता हिचा मृतदेह रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

निकीताची आत्महत्या नसुन घातपाताचा नातेवाईकांचा संशय

तालुक्यातील बाळद येथील सासरच्या राहत्या घरात निकीता हिचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना ११ एप्रिल रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास समोर आली आहे. निकीता ही बाळद येथे राहत्या घरी असतांना निकीता हिचा पती अनिल पवार हे निकीता हिच्या माहेरी आमदडे ता. पाचोरा येथे आले होते. अनिल पवार यांनी विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केला. त्यांना सासरच्या मंडळींनी समज दिला.

त्यानंतर अनिल पवार हा मोटरसायकल वरुन जात असतांना अनिल पवार यांनी सासरच्या मंडळींना सांगितले की, तुमच्या मुलीने फाशी घेतली आहे. असे सांगुन आमदडे येथुन पसार झाला. यामुळे निकीता हिच्या माहेरच्या मंडळींनी संशय व्यक्त करत निकीता हिने आत्महत्या केली नसुन तिचा घातपात झाला आहे. असा आक्रोश नातेवाईकांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयासमोर केला. मयत निकीता हिस एक मुलगा, एक मुलगी, वृद्ध आई, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.