पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क
बाळद बुद्रुक ता. पाचोरा येथे दि. २४ रोजी दुपारी वीज पडून बैल ठार झाल्याची घटना घडली असुन त्याच्याच बाजूला संदीप भालचंद्र पाटील यांच्या पत्नी रोशनी सोमवंशी (वय ४०) व मुलगा हर्षल सोमवंशी (वय २१) हे उभे होते. त्यांना देखील विजेचा जबरदस्त धक्का पोहोचला असून रोशनी सोमवंशी यांच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे. तसेच मुलाला देखील जबरदस्त झटका बसला असून हे दोन्ही जण थोडक्यात बचावले आहे.
दोघांना तात्काळ पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. एकीकडे दुःख आणि एकीकडे सुख अशी बाळद वासियांची गत झाली आहे.
अतिशय गरीब परिस्थिती असलेले शेतकरी संदीप सोमवंशी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अचानक आलेल्या संकटामुळे त्यांना चांगलाच धक्का बसला आहे. त्यांना तात्काळ शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी होत आहे.