‘नो पार्किंग’ मधल्या वाहनांवर अतिक्रमण विभागाची कारवाई

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहर महानगरपालिकेकडून काल दि. २४ जून रोजी सायंकाळी अतिक्रमण विभागातर्फे कारवाई करण्यात आली. महानगरपालिकेसमोरील नाथ प्लाझा पासून ते टॉवर चौक, टॉवर चौक ते चित्रा चौक, टॉवर चौक ते चौबे शाळा या परिसरात अतिक्रमण विभागातर्फे रस्त्यावर नो पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.

या परिसरात बऱ्याच प्रमाणावर मोठी व्यवसायिक दुकाने, बाजारपेठ, हॉटेल्स व व्यापारी संकुल असल्यामुळे येथे पार्किंगसाठी रस्त्याचा वापर करण्यात येतो. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे सदर नो पार्किंगच्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. नाथ प्लाझा व्यापारी संकुल ते टॉवर चौक या परिसरात नाद प्लाझा, प्रभात फाउंटन, आर्य निवास या ठिकाणी आलेल्या ग्राहकांची वाहने रस्त्यावर लागलेली असतात. त्यामुळे बऱ्याचदा याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन वाहतूकीला खोळंबा निर्माण होतो. हा मुख्य रस्ता असल्यामुळे या ठिकाणी वाहनांची वर्दळ देखील अधिक असते. परिणामी नो पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांनी बऱ्याच समस्या निर्माण होत असतात.

दरम्यान या परिसरात व्यापारी संकुलात येणाऱ्या ग्राहकांची संख्याही जास्त असून, सुयोग्य अशी पार्किंग व्यवस्था नसल्याची ओरड देखील वाहनधारकांकडून होते. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या परिसरात नटवर शॉपिंग कॉम्प्लेक्स, फुले मार्केट पार्किंग आणि गांधी मार्केट पार्किंग वगळता अतिरिक्त पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहनधारक रस्त्यावर वाहने पार्क करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.