जामनेरचे हिरो…

0

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघातील जामनेर नगरपालिकेत नगराध्यक्षपदासह सर्वच्या सर्व 25 जागा जिंकून भाजपने विरोधकांनाही सपाट केले आहे. सर्वच्या सर्व जागा जिंकणारे जामनेर नगरपालिका ही राज्यातील एकमेव नगरपालिका म्हणता येईल. आज राज्यात ज्या नगरपालिकेच्या निवडणूका झाल्या. त्यात कोणत्याही नगरपालिकेत भाजपला एवढे घवघवीत यश मिळाले नाही. 100 टक्के जागा जिंकून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपले निर्विवाद वर्चस्व सिध्द केले आहे. त्यामुळे जामनेरच्या राजकारणात ते हिरो बनले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करून भाजप विरूध्द निवडणूक लढविली. परंतु त्यांचे सर्व उमेदवार पराभूत झाले. नगराध्यक्षपदाच्या झालेल्या थेट निवडणूकीतही गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या प्रा.अंजली पवार यांच्या 8 हजार 353 मतांने दणदणीत पराभव केला. नगराध्यक्षपदाची निवडणूक ही अटीतटीची होईल. तसेच साधना महाजन यांची उमेदवारी अडचणीत असल्याच्या वावळ्या विरोधकांनी उठविलेल्या होत्या. परंतु नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीतही विरोधकांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. केवळ निवडणूकीवर डोळा ठेवून कसलाही कार्यक्रम नसतांना एकत्र आलेल्या विरोधकांचा जामनेर वासियांनी धुव्वा उडविला. 24 नगरसेवक असलेल्या जामनेर नगरपालिकेत भाजपचे 8 मुस्लिम नगरसेवकही निवडूण आले आहेत. याचा अर्थ जामनेरमध्ये मुस्लिम भाजपच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट दिसून येते. अर्थात याचे सर्व श्रेय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाला द्यावे लागेल. जातीपातीवर निवडणूकीचा मुद्या न करता गिरीश महाजन यांनी जामनेर नगरपालिकेत विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढविली होती. जामनेरवासियांनी विकासाला मत देवून 100 टक्के जागावर विजय प्राप्त करून इतिहास निर्माण केला.
पहिल्या पंचवार्षिक निवडणूकीत जामनेर न.पा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने एकूण 14 जागा जिंकून अडीच वर्षे आपली सत्ता प्राप्त केली. त्यानंतर त्यांचे नगरसेवक फुटले आणि भाजपला मिळाल्याने साधना महाजन या अध्यक्षा बनल्या. अडीच वर्षोच्या मिळालेल्या कालावधीत आपले पती गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात जामनेरचा कायापालट करण्याची पराकाष्टा केली. त्यामुळेच जामनेरवासियांनी पुन्हा एकदा भाजपला संधी दिली. ही संधी इतकी भरभरून दिली कि जामनेर नगरपालिका सभागृहात विरोधकांचे नामोनिशान मिटविले. सभागृहात एकही विरोधी पक्षाचा सदस्य निवडूण येवू नये हे विरोधकांच्या दृष्टीने आणि लोकशाहीच्या दृष्टीनेही दुर्देवी बाब म्हणावी लागेल. जामनेर न.पा. निवडणूक निकाल म्हणजे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीची रंगीततालीम होय. जामनेरचा निकाल हा विरोधकांमध्ये धडकी भरविणारा आहे. जळगाव महापालिकेची निवडणूक येत्या ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये होणार आहे. जळगाव मनपात गेल्या 25 वर्षापासून सुरेशदादा च्या नेतृत्वात असलेल्या खान्देश विकास आघाडीची सत्ता आहे. जामनेरच्या या अभुतपूर्व निकालाचे जळगाव महापालिका निवडणूकीवर तीव्र पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही. भाजप-सेना युती होण्याची शक्यता आता दुरावलीच आहे. भाजपचा आत्मविश्‍वास वाढला आहे. त्यामुळे खान्देश विकास आघाडी सेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यासमोर आता गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे.
जामनेर नगरपालिकेच्या निकालाने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे राज्याच्या राजकारणात महत्व वाढणार यात शंका नाही. गिरीश महाजन हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्‍वासू सहकारी तर आहेतच त्यातच जामनेर न.पा.निवडणूक निकालाने आणखीन दुधात साखर पडली असे म्हणावे लागेल आता जळगाव जिल्ह्याचे आगामी राजकारणात बदल झालेला दिसून येईल. चार महिन्यावर आलेल्या जळगाव पालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपतर्फे गिरीश महाजन यांचेवर जबाबदारी सोपवतील यात शंका नसावी. आतापर्यंत जळगाव महानगरपालिकेत भाजपला सत्ता मिळालेली नाही. आता गिरीश महाजनांकडे निवडणूकीची जबाबदारी सोपविली तर मनपावर भाजपचा झेंडा फडकू शकतो असा विश्‍वास भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला वाटणे सहाजिक आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे समर्थक विधान परिषदेचे जळगावचे आ.चंदुभाई पटेल यांनी मजामनेर एक झाकी है.. जळगाव अभी बाकी हैफ… असे केलेले वक्तव्य सुचक असेच म्हणता येईल. याचा अर्थ जामनेरच्या निकालाने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे हिरो बनले आहेत. जामनेर नगरपालिकेत भाजपला मिळालेल्या 100 टक्के यशाबद्दल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.