ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय महिलांची यशोगाथा

0

लोकशाही विशेष लेख 

 

२० व्या शतकात भारताची सर्व ऑलिम्पिक पदके पुरुषांनी जिंकली होती. आता आपण येथे भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकलेल्या सर्व महिलांच्या यशाचा आढावा घेणार आहोत. एकंदर गोळाबेरीज करता आजपर्यंत महिलांनी एकूण ७ ऑलिम्पिक पदके जिंकलेली आहेत. तर आज जाणून घेऊया बॅडमिंटनपटू सायना नेहवाल बद्दल..

सयाना नेहवाल (Sayana Nehwal) यांचा जन्म १७ मार्च १९९० साली हरियाणातील हिस्सार येथे झाला. वडिलांची बदली झाल्याने त्यांचे शिक्षण हैदराबाद (Hyderabad) येथे झाले. त्यांचे आई व वडील दोघेही उत्तम बॅडमिंटन खेळाडू होते. मुलीतील प्रतिभा ओळखून वडिल रोज पहाटे ४ वाजता त्यांना सरावाला घेऊन जात. हैदराबाद येथील लाल बहादूर संकुलातील ‘नानी प्रसाद’ हे सायनाचे पहिले गुरु, कालांतराने त्यांनी ‘एस. एम. आरिफ’ याचे मार्गदर्शन घेतले. मात्र अजून प्रगत प्रशिक्षणासाठी त्यांनी पुलेला गोपीचंद प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेतला आणि जगप्रसिद्ध मार्गदर्शक गोपीचंद यांच्याकडून धडे गिरवले.

ऑलिम्पिक (Olympics) स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या तसेच जागतिक कनिष्ट स्पर्धा जिंकणाऱ्या त्या पहिल्या महिला भारतीय आहेत. तसेच २००९ साली झालेल्या इंडोनेशियन खुल्या स्पर्धा जिंकणाऱ्या त्या पहिल्या महिला भारतीय आहेत. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी ऐतिहासिक कामगिरी करत कांस्य पदक जिंकून भारताच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला. त्यांनी खऱ्या अर्थाने भारतातील महिलांनाच नव्हे तर तमाम जनतेला बॅडमिंटनचे वेड लावले. त्यांच्या या अभूतपूर्व कामगिरीसाठी त्या भारताच्या ‘फुलराणी’ या उपाधीने प्रसिद्ध आहेत.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदकांसह, सायना यांना २००९ मध्ये अर्जुन पुरस्कार (Arjuna Award), २०१० मध्ये राजीव गांधी खेलरत्न व पद्मश्री आणि २०१६ मध्ये पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले.

डॉ. निलेश जोशी, जळगाव
७५८८९३१९१२

Leave A Reply

Your email address will not be published.