नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई, प्रत्येकी ५ हजारांचा दंड

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर महानगरपालिकेच्या पथकाने मंगळवारी (दि.९) विविध भागात धाडसत्र राबविले. ख्याँजामिया दर्गाजवळ रस्त्यावर मांजा जप्त करण्यात आला. संबंधितास जागेवरच पाच हजाराचा दंड आकारण्यात आला. मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर होतो. गेल्या आठवड्यात शुक्रवारी दुर्वा बापू माळी (वय ११, रा.पिंप्राळा) ही बालिका मांजामुळे जखमी झाली आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे सहायक आयुक्त पाटील यांनी मुख्य स्वच्छता निरीक्षक उल्हास इंगळे, जितेंद्र किरंगे, नागेश्वर लोखंडे, रमेश कांबळे, आरोग्य निरीक्षक ललित बऱ्हाटे, धीरज गोडाले, विशाल वानखेडे. मुकादम भरत ढंढोरे, चेतन जावळे व इम्रान भिस्ती यांचे पथक तयार केले. या पथकाने जोशी पेठेतील पतंग गल्लीत नऊ विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी केली असता एकाही जणाकडे मांजा आढळून आला नाही.

एका दुकानाची तपासणी होत असतांनाच अन्य विक्रेते सावध झाल्याची चर्चा आहे. ख्याँजामिया दर्ग्याजवळ मात्र एका व्यक्तीकडे १किलो मांजा आढळून आला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.