विज्ञान आणि अध्यात्म यामध्ये कोणत्याही प्रकारचा संघर्ष नाही-डॉ. ज्ञानानंददास स्वामी

0

जळगाव ;- विज्ञान आणि अध्यात्म यामध्ये कोणत्याही प्रकारचा संघर्ष नाही मात्र अलिकडच्या काळात विज्ञानाधारित साधनांवर विश्वास ठेवला जात असून साधनेवर मात्र विश्वास ठेवला जात नाही अशी खंत बीएपीएस स्वामी नारायण रिसर्च इन्स्टिट्यूट, अक्षरधाम नवी दिल्ली येथील सहायक संचालक डॉ. ज्ञानानंददास स्वामी यांनी व्यक्त केली.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शनिवार दि. २७ जानेवारी रोजी यशोवल्लभ व्याख्यानमाले अंतर्गत डॉ. ज्ञानानंददास स्वामी यांचे ‘विज्ञान आणि अध्यात्म: मानवी प्रगतीचे संश्लेषण’ या विषयावर व्याख्यान झाले. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, व्याख्यानमालेचे प्रायोजक ॲङ गिरीधरलाल गुजराथी उपस्थित होते. डॉ. ज्ञानानंद स्वामी म्हणाले की, आज दिसणाऱ्या विज्ञानाचे मुळ वेदांमध्ये आहे. प्राचीन शास्त्रातील अध्यात्मात विज्ञानाशी निगडीत बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. जे मॉडर्न आहे ते विज्ञान आणि जे पारंपारिक आहे ते अध्यात्म अशा समज आपण करून घेतला आहे. मोबाईल द्वारे संदेशवहन होतो ते विज्ञान आहे मात्र मोबाईलच्या व्यसनापासून दूर करण्यासाठी अध्यात्म आहे. आपण साधनांवर विश्वास ठेवत आहोत मात्र साधनेवर विश्वास दृढ व्हायला हवा असे सांगतांना अनेक पाश्चिमात्य वैज्ञानिकांनी भारतीय परंपरेचे कौतुक केल असल्याचे त्यांनी काही उदाहरण देत स्पष्ट केले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी विज्ञान हे प्रमाणावर अधारीत असून अध्यात्म हे आस्थेवर आधारीत आहे त्यामुळे दोन्हीमध्ये संतुलन हवे त्यातून चांगले राष्ट्र आणि चांगले नागरिक निर्माण होतील असा विश्वास व्यक्त केला. प्रारंभी धर्मिन गुजराथी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पुरूषोत्तम पाटील यांनी केले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे डॉ. ज्ञानानंददास यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.