विद्यापीठाच्या योगशास्त्र विभागाच्या चिकित्सा पध्दतीचा २०९ जणांनी घेतला लाभ

0

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योगशास्त्र विभागाच्यावतीने योगायुर्वेद थेरपि युनिटच्या माध्यमातुन विविध चिकित्सा पध्दती सुरू केली असून अवघ्या दहा महिन्यात २०९ जणांनी या चिकित्सा पध्दतीचा लाभ घेतला आहे.

विद्यापीठात काही वर्षापूर्वी योग मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले होते. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी हे स्वत: योगाच्या प्रसार व प्रचारासाठी आग्रही असल्यामुळे या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठातील आंतरविद्याशाखीय अभ्यास प्रशाळे अंतर्गत योगशास्त्र विभाग सुरू करण्यात आला. एम.ए योगशास्त्र हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. योगशास्त्र विभागाच्या माध्यमातुन अत्याधुनिक असे योगायुर्वेद थेरपि युनिट सुरू करण्यात आले आहे. स्वास्थ्य संवर्धन व रोग निवारणासाठी पाच भारतीय वैद्यकीय पध्दतीपैकी आयुर्वेदातील पंचकर्म व योगशास्त्रातील षटकर्म यांचा मेळ साधुन शिरोधारा, बॉडी मसाज, स्टीमबाथ, बस्ती, नस्य, वमन, जलनेती, सुत्रनेती, कपालभाती, अग्निसार यासारख्या चिकित्सा पध्दती सुरू करण्यात आल्या आहेत. या युनिटमध्ये अत्याधुनिक उपकरणे आहेत. विशेष म्हणजे विद्यापीठातील कर्मचा-यांसोबत बाहेरील व्यक्तीनाही या चिकित्सा पध्दतीचा लाभ घेता येतो. फुल बॉडी मसाज स्टीमबाथसह यासाठी ३०० रूपये, शिरोधारासाठी १५० रूपये, वमन ६० रूपये, नस्य ४० रूपये व जलनेती ४० रूपये या प्रकारचे अत्यल्प शुल्क आकारले जाते.

दहा महिन्यापुर्वी सुरू झालेल्या या चिकित्सा पध्दतीचा २०९ जणांनी लाभ घेतला असून यामध्ये १२३ स्त्रिया तसेच ८६ पुरूष यांचा समावेश आहे. या योग केंद्राचे विभागप्रमुख म्हणून इंजि. राजेश पाटील कार्यरत असून योगायुर्वेद थेरपिच्या माध्यमातुन डॉ. लीना चौधरी, प्रा. गितांजली भंगाळे यांच्या सहका-याने सहायक योग थेरेपिस्ट म्हणून माधवी तायडे व तुषार सोनवणे हे काम करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.