निर्भय बनो’ संघटनेला मिळतोय वाढता प्रतिसाद

0

केंद्रातील विद्यमान भाजप शासनाच्या विरोधात वैचारिक दृष्ट्या आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्र ‘निर्भय बनो’ या राजकीय संघटनेला तसेच या संघटनेच्या वतीने आयोजित महाराष्ट्रातील विविध ठिकाणी आयोजित सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. मे २०२३ मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेचा कुणीही सभासद होऊ शकतो. या संघटनेत कोणीही पदाधिकारी नाहीत. सर्व सभासद एकसारखे अधिकाराचे असतील. कसल्या प्रकारची कुणाकडून देणगी अथवा वर्गणी गोळा केली जात नाही. प्रत्येक सभासद सभासद आपापल्या कुवतीप्रमाणे वैयक्तिक खर्च करतात. मे पासून आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पातळीवर तसेच तालुका पातळीवर विचार सभा घेतल्या जात आहेत. या सभांना त्या त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद मिळतो आहे. सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, एडवोकेट असीम सरोदे, कुमार सप्तर्षी, पत्रकार निखिल वागळे आदी सामाजिक कार्य करणाऱ्या नेत्यांचा सक्रिय सहभाग यात आहे. स्थानिक पातळीवरील समविचारी लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. एक महिन्यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे झालेल्या निर्भय बनसभेत प्रमुख वक्ते विश्वंभर चौधरी यांचे भाषण सुरू असताना सभेत विरोधकांच्या टोळक्याने घुसून ‘देवधर्मा विरुद्ध तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध भाषण करू नका’ अशा घोषणा देत प्रमुख वक्ते विश्वंभर चौधरी यांच्यावर हल्ला करून भाषण बंद पाडले. त्या हल्ल्यातून विश्वंभर चौधरी थोडक्यात बचावले. भाषण स्वातंत्र्यावर लोकशाहीत कोणीही बंदी घालू शकत नाही. तथापि हल्लेखोरांनी सभागृहात घुसून धुडगूस घातला आणि चौधरींचे भाषण बंद पाडले व हल्ल्याचा यशस्वी प्रयत्न केला. या घटनेचा महाराष्ट्रभर निषेध झाला, परंतु महाराष्ट्र शासनाने त्याची दखल घेतली नाही. परंतु यामुळे ‘निर्भय बनो’च्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. नुकतेच सिन्नर येथे त्याच ठिकाणी ‘निर्भय बनो’च्या कार्यकर्त्यांची प्रचंड सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. डी एन कराड हे होते आणि विश्वंभर चौधरी एडवोकेट असीम सरोदे आणि पत्रकार निखिल वागळे यांची जोरदार भाषणे झाली. हल्लेखोरांच्या नाकावर टिच्चून झालेल्या सभेत सिन्नरकरांचा तसेच परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या सभेला मिळाला.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली होती, अनेक लोकांना तुरुंगात डांबले होते, वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बंदी घातली होती, भाषणावर बंदी होती. त्यानंतर कै. जयप्रकाश नारायण यांचे नेतृत्वात जे आंदोलन झाले तेव्हा त्या आंदोलनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्याचा परिणाम पंतप्रधान इंदिरा गांधींची पर्यायाने काँग्रेसची सत्ता उलथून टाकली. यामुळे कुठल्याही वैचारिक आंदोलनाला कोणीही चिरडू पाहत असेल तर ते बुमरँग त्यांच्यावर उलटू शकते, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. एका महिन्यापूर्वी ‘निर्भय बनो’च्या सभेला संयोजक गाफील असल्यामुळे सिन्नरच्या त्या सभेत गोंधळ होऊन सभा होऊ दिली नाही. परंतु परवा सिन्नल येथे झालेल्या नियोजन पूर्व सभेमध्ये फिरकण्याची हिंमत सुद्धा विरोधी टोळक्यांची झाली नाही आणि सभेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला हे विशेष. धर्माच्या विरोधात बोलायचे नाही, समाजाच्या विरोधात वक्तव्य करायचे नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार खोडून काढायचे नाहीत, ही सत्ताधारी पक्षाची कृती असेल तर ती लोकशाहीच्या विरोधात आहे. विचाराने विचाराशी सामना झाला पाहिजे. महाराष्ट्रातील भाजप-सेना-राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांनी ध्यानात ठेवले पाहिजे. जेवढा विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होईल त्यापेक्षा जास्त विरोधकांचा आवाज वाढेल आणि हे सत्ताधाऱ्यांच्या सत्याला महागात पडू शकते. सत्ताधाऱ्यांच्या या कृतीमुळे त्यांची पीछेहाट होत असून सत्तेवर नसलेले उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत धोका पत्करायचा नसेल तर सत्ताधाऱ्यांनी या गोष्टी टाळाव्यात. त्यामुळे ‘निर्भय बनो’ या राजकीय संघटनेला सर्वसामान्य जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.