भुसावळातील प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्यावर निलंबनाची कारवाई

0

आमदारांच्या तक्रारीनंतर महसूलमंत्री विखे पाटलांची घोषणा

जळगाव / मुक्ताईनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत भुसावळातील प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांना निलंबित केल्याची घोषणा आज मंगळवारी सभागृहात केली. यामुळे जिल्ह्यात खलबल उडाली आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला होता. तसेच अनेक तक्रारी करण्यात आल्याने हि निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी अवैध गौणखनिज प्रकरणी विधानसभेत प्रश्‍न उपस्थित केले होते. यात प्रामुख्याने मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड शिवारातील खडसे कुटुंबाची मालकी असलेल्या भुखंडावरील उत्खननाची तक्रार करण्यात आली होती. यानंतर या प्रकरणी एसआयटी देखील निर्मित करण्यात आली आहे.

यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी बोदवड तालुक्यातील महालक्ष्मी स्टोन क्रेशरच्या अवैध उत्खननाची देखील तक्रार केली होती. यात या स्टोन क्रेशर चालकाने २०१७ ते २०१९च्या दरम्यान अवैध उत्खनन केले. या प्रकरणी आपण केलेल्या तक्रारीनंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र प्रांताधिकार्‍यांकडे अपील दाखल करण्यात आल्यानंतर या कारवाईला तात्काळ स्थगिती देण्यात आली.

आज चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत हा मुद्दा पुन्हा उपस्थित करत कारवाईची मागणी केली. दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यानंतर आमदार संजय सावकारे यांनी देखील प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्या गैरकारभाराचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. प्रांताधिकारी सुलाणे यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्याची माहिती आमदारांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.