जळगावच्या रंगभूमीला खुणावतेय आकांक्षाचे क्षीतिज

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

एकंदरीतच खान्देशच्या सांस्कृतिक इतिहासाचा धांडोळा घेतला असता, फार पूर्वीपासून जळगावात नाट्यचळवळ रुजली असल्याचे दाखले अनेक ठिकाणी मिळतात. दस्तुरखुद्द नटश्रेष्ठ बालगंधर्वांचे आजोळ असणारी भूमी म्हणजे जळगाव. वर्तमानात जळगावचे सांस्कृतिक क्षेत्र विस्तार पावते आहे. जुन्या, अनुभवी रंगकर्मींच्या मार्गदर्शनाखाली नव्या सांस्कृतिक जाणिवांचे लेणं लेवून नवे शिलेदार विविध संस्थांच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवून जळगावचे काही काळापूर्वी हरविलेले सांस्कृतिक विश्‍व समृध्द करण्यासाठी कार्यरत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून संगीत – नृत्य – नाट्य या तिहेरी कलासंगमावर कलासाधकांची कामगिरी उंचावल्याचे दिसते. कलावंताला व्यासपीठ मिळवून देणे, विविध कलाप्रांतात त्यांना प्रतिनिधीत्वाची संधी उपलब्ध होण्यासोबतच त्यांच्यातील उपजत प्रतिभेला नव्या आकांक्षांची जोड देवून कलाआकाशात झेपावण्याची ताकद निर्माण करण्याच्या सर्व संस्थांच्या प्रयत्नांना सामुहिक साथ मिळत आहे. कलेचे हे विविध प्रांत आपापल्या परीने नव्या दमाचे नवे रंगभिडू घडवून त्यांच्या नवकर्तृत्वाने एक नवीन सांस्कृतिक इतिहास निर्माण करत आहेत हे जळगावच्या सांस्कृतिक विश्‍वासाठी सुचिन्हच म्हणावे लागेल.

कलाक्षेत्राच्या या भरारीला साथ देणार्‍या विविध आस्थापनांनाचा उल्लेख या ठिकाणी महत्त्वाचा ठरेल. पूर्वीच्या काळापासून पाहिले असता कोणतीही कला ही राजाश्रयाशिवाय पुढे जावू शकत नाही. कालांतराने परिस्थिती बदलत गेली. तरीही सामाजिक जाणिवांचे भान ठेवत कलाविश्‍व वृध्दींगत होण्यासाठी जळगावात कार्यरत असणारे जैन उद्योग समूह, भवरलाल आणि कांताबाई चॅरिटेबल ट्रस्ट, नवजीवन प्लस सुपरशॉप, पीपल्स को ऑप बँक यांच्या आर्थिक मदतीच्या माध्यमातून एक समृध्द सांस्कृतिक गाव म्हणून जळगावचे चित्र उभारण्यास मोठ्या प्रमाणात हातभार लागत आहे. यात आणखी मोलाचा वाटा उचलला आहे तो महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धा, कामगार कल्याण केंद्राच्या नाट्यस्पर्धा, बालनाट्यस्पर्धा, एकांकिका स्पर्धा, समरगीत स्पर्धा, भजन स्पर्धा अशा विविध कलाप्रकारांसोबतच संस्कृतीची जपणूक करणारे केशवस्मृती प्रतिष्ठानच्या ललित कला अकादमीतर्फे सातत्याने घेतल्या जाणार्‍या भुलाबाई महोत्सवाचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे.

या सर्व माध्यमातून कलेच्या क्षितिजावर तेजाने तळपणार्‍या विविध संस्थांनी हा सांस्कृतिक कलायज्ञ धगधगता ठेवला आहे, त्या म्हणजे खान्देश नाट्य प्रतिष्ठान, पंचम, संस्कार भारती, चांदोरकर प्रतिष्ठान, विवेकानंद प्रतिष्ठान, मु. जे. महाविद्यालय, श्री महालक्ष्मी थिएटर्स, डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महाविद्यालय, ओम थिएटर्स, स्वरवेध फाऊंडेशन, दिशा बहुउद्देशीय संस्था, भरारी फाऊंडेशन, परिवर्तन जळगाव, जननायक थिएटर, जैन चॅरिटीज, जहागिरदार प्रतिष्ठान, पायल संगीत नृत्यालय, गोदावरी संगीत महाविद्यालय, अनुभूती शाळा, नेहरु युवा केंद्र, रोटरी ईस्ट – वेस्ट – मिडटाऊन, ओजस्विनी, ललित कला महाविद्यालय, व.वा. वाचनालय, मेलडी सुपर हिट्स, स्वरगंध, स्वराश्रय संस्था आदी संस्थांचेही मौलिक योगदान आहे.

के.सी.ई.चे मु.जे.महाविद्यालय, ओजस्विनी, डॉ.अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महाविद्यालयात कलाक्षेत्रातील उपलब्ध झालेल्या अभ्यासक्रमांमुळे तंत्रशिक्षित नवकलावंतांची एक संपूर्ण पिढी आता घडणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून मु.जे. महाविद्यालयाच्या नाट्यविभागाच्या मुशीतून घडलेले अनेक कलावंतांसह इतर मेहनती कलावंत आज जळगावसह मराठी व्यावसायिक रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रमालिकांमधून नावारुपास आलेले आहेत. यात प्रामुख्याने संदीप मेहता, प्रतिभा जगताप शर्मा, मंदाकिनी महाजन, समीर देशपांडे, अनुपमा ताकमोगे, हास्यजत्रा मालिकेतून गाजणारा हेमंत पाटील यांच्यासह मराठी बिगबॉसची विजेती ठरलेली मेघा धाडे, विविध मालिकांतून गाजणारे अमृता देशमुख, अभिषेक देशमुख, ललिता अमृतकर तसेच गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील अभिनयाने गाजलेली एनएसडी कलावंत पल्लवी जाधव यांचा समावेश आहे. या सर्व कलावंत मंडळींची जडणघडण जळगावच्या सांस्कृतिक वर्तुळात झालेली आहे.

या कलावंतांच्या यशामुळे तसेच उपलब्ध झालेल्या अनेक शैक्षणिक अभ्यासक्रमांमुळे अनेक युवक युवती आता या क्षेत्राकडे वळू लागलेले आहेत. बेंडाळे महाविद्यालयाला ब्रॉडकास्टिंग आणि पत्रकारिता, फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी, फिल्म मेकिंग, नाट्यशास्त्र, नाटक आणि दूरचित्रवाहिन्या याविषयीच्या नवीन अभ्यासक्रमांना मान्यता मिळाल्यानंतर सुरु झालेले सर्व अभ्यासक्रम जळगावचा सांस्कृतिक परिघ विस्तारण्यासोबतच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील कलावंतांना प्रशिक्षित करणारे ठरणार आहेत.

जळगावच्या रंगभूमीचा विचार करता बालरंगभूमीला गेल्या ४० वर्षांचा इतिहास आहे परंतु मध्यंतरीच्या काळात बालरंगभूमीचे अस्तित्वच नव्हते.  १९८७ ते १९९२ या कालावधीमध्ये खान्देश नाट्य प्रतिष्ठानच्या चिंतामण पाटील, ज्ञानेश्‍वर गायकवाड, योगेश शुक्‍ल, संजय निकुंभ, शाम जगताप, सुनिल कानडे यांच्या माध्यमातून ही चळवळ फोफावली होती पण कालांतराने ती बंद झाली. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र शासनाच्या बालराज्यनाट्य स्पर्धेला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता बालरंगभूमीविषयी एक आश्‍वासक चित्र निर्माण होत आहे. नव्या पिढीचे अमोल ठाकूर, आकाश बाविस्कर, योगेश पाटील, नुपूर पांडे, धनंजय धनगर, हनुमान सुरवसे हे नवे शिलेदार आता बालरंगभूमीच्या विकासासाठी कार्यरत आहेत.परंतु गेल्या काही वर्षात काही शाळांमधील कार्यक्रम व बालनाट्य स्पर्धा या व्यतिरिक्‍त त्यांचे कार्य विस्तारले नसून, ते अजून वृध्दींगत होण्याची अपेक्षा त्यांच्याकडून आहे. निश्‍चित जुन्या जाणत्या रंगकर्मींच्या मार्गदर्शनाने ते त्यांना सहजसाध्य होवून बालकलावंतांना कलेचे बाळकडू निश्‍चितच मिळेल हे आशादायक चित्र आहे.

चित्रपट, माहितीपट, वृत्तपट हे केवळ काही महानगरांची मालकी म्हणून ओळखली जात होती. मात्र गेल्या वर्षभरापासून मिलिंद पाटील, प्रशांत पाटील, योगेश पाटील, वैभव मावळे व त्यांचे सहकार्‍यांच्या परिश्रमातून अनेक शाॉर्टफिल्म, माहितीपटांची निर्मिती शहरातूनच सुरु झाली आहे. या माध्यमातून जळगावातील कलावंतांना एक नवे माध्यम मिळाले असून, ते विकसित होण्यास जास्त कालावधी लागणार नाही. यातूनही भविष्यातील अनेक दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमध्ये जळगावचे अनेक चेहरे दिसू लागले तर आश्‍चर्य वाटायला नको.

या प्रमाणे सर्व चित्र आशादायक वाटत असले तरी अधिक मेहनतीची आवश्यकता निश्‍चितच आहे. ज्येष्ठांनी मार्गदर्शन करावे, नव्यांनी त्या आधारावर आपल्या कल्पनाविस्तारावर आधारित कलाविष्कार सादर करावेत या सामूहिक बळावर जळगावचे सांस्कृतिक क्षेत्र वृध्दींगत व्हावे या अपेक्षेसह नव्या सांस्कृतिक जगाचा वेध घेत, कलेच्या विविध प्रांतात नवे आयाम घेवून कलाविष्कार सादर करणार्‍या ह्या सार्‍या संस्था, त्यांचे व्यवस्थापन तसेच या कलाविष्कारांमध्ये सहभागी असलेले रंगकर्मी, गायक, वादक, नर्तक या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांना अभिनंदनासह भविष्यासाठी सदिच्छा…!

Leave A Reply

Your email address will not be published.