नवीन संसदेचा श्री गणेशा ! मोदी म्हणाले ‘जुनी संसद न म्हणता..’

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज गणेश चतुर्थीच्या शुभ प्रसंगी नवीन संसदेचा श्री गणेशा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चतुर्थीच्या शुभेच्छा देत जुन्या संसद भवनामधून नवीन संसद भवनात देशाचा कारभार चालवण्याआधी दिलेल्या आपल्या शेवटच्या भाषणाची सुरुवात केली.

मोदी म्हणाले की, नवीन संसदेमध्ये आपण आपल्या भविष्याची श्री गणेशा करणार आहोत. हे भवन आणि येथील सेंट्रल हॉल हा एका प्रकार आपल्या भावनांनी भरलेला आहे. हे सेंट्रल हॉल आम्हाला भावूकही करतो आणि कर्तव्याची जाणीवही करुन देताना प्रेरणाही देतो. स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी याचा वापर एखाद्या ग्रंथालयासारखा केला जायचा. नंतर या ठिकाणी संविधानासंदर्भातील बैठका सुरु झाल्या. त्यामध्ये सविस्तर चर्चा होऊन आपल्या संविधानाने यामधूनच आकार घेतला. याच ठिकाणी 1947 साली इंग्रजांनी भारतीयांच्या हातात देशाचा कारभार दिला. हा सेंट्रल हॉल त्या इतिहासाचाही साक्षीदार आहे. आपण आपलं राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजही याच हॉलमध्ये स्वीकारला. या संसदेने देशातील अनेक बदल पाहिले आहेत, असं म्हटलं आहे.

विकासाच्या वाटेवर वाटचाल

तसेच पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘हा सेंट्रल हॉल आपल्या आठवणींबरोबरच भावनांनी भरलेला आहे, याच संसदेमध्ये ट्रीपल तलाखविरोधात कायदा झाला, आमचं सौभाग्य आहे की याच संसदेमध्ये आम्ही अनुच्छेद 370 पासून सुटका मिळवण्यासाठी दहशतवादाविरोधात कारवाई करणारं मोठं पाऊल उचललं, आज जम्मू-काश्मीरने शांतता आणि विकासाच्या वाटेवर वाटचाल सुरु केली आहे, असा उल्लेख करत पंतप्रधान मोदींनी, ‘लाल किल्ल्यावरुन मी म्हटलं होतं की हीच योग्य वेळ आहे,’ अशीही आठवण करुन दिली.

भारतीयांच्या महत्त्वकांशांना पहिलं प्राधान्य 

याप्रसंगी मोदी म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास भारत हा पाचव्या स्थानी आहे. लवकरच भारत अव्वल 3 मध्ये सहभागी होईल. भारताने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. आज भारतामध्ये नवीन ऊर्जा दिसून येत आहे. गुलामगिरीच्या बेड्यांनी तरुणांच्या महत्त्वाकांशा दाबून ठेवल्या होत्या. आम्हाला नवीन लक्ष्य निश्चित करायची आहेत. आम्ही जे काही बदल करु त्यामध्ये भारतीयांच्या महत्त्वकांशांना पहिलं प्राधान्य देणं आवश्यक आहे. भारत हा चेतनेनं जागा झाला आहे. 75 वर्षांचा अनुभव आमच्याकडे आहे. यामधून आपण शिकलं पाहिजे. आपल्याकडे फार मोठा वारसा आहे.

संविधान सदन

आज आपण या वस्तूचा निरोप घेऊन नवीन संसदेत जात आहोत. हे शुभकाम आपण गणेश चतुर्थीच्या दिवशी करत आहोत. उपराष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांना माझी एक विनंती आणि सल्ला आहे की जेव्हा आपण नवीन संसद भवनामध्ये जाऊ तेव्हा या संसद भवनाचा मान-सन्मान कमी होतो कामा नये. म्हणून याला जुनी संसद म्हणता कामा नये. याला आपण ‘संविधान सदन’ असं म्हटलं पाहिजे. या माध्यमातून ही वास्तू आपल्याला कायम प्रेरणा देत राहील. ही वास्तू भावी पिढ्यांना अनमोल ठेवा म्हणून सुपूर्द करता येईल. ही संधी आपण गमावता कामा नये, असंही म्हटलं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.