जुन्या संस्कारांना आधुनिक विचारांची जोड अत्यंत प्रभावी

मानसोपचार तज्ञ डॉ. कांचन नारखेडे यांनी सांगितले नवरात्रीच्या नऊ देव्यांचे आणि रंगांचे मानसशास्त्रीय प्रतीक

0

 

नवरात्री विशेष जागर संस्कृतीचा

डॉ. कांचन नारखेडे

मानसोपचार तज्ञ

 

आपण अनेक सण साजरे करतो, मात्र हल्लीच्या काळात या सणांचं मॉडर्निझेशन म्हणजेच आधुनिकीकरण झालेल आहे.. हे सण साजरे करण्याची पद्धत देखील बदलली आहे.. आपण पाश्चात्त्य संस्कृतीचा अनुकरण करतो. त्याचप्रमाणे या सणांना देखील पाश्चात्य पद्धतीचे स्वरूप आले आहे.. यामुळे मूळ संस्कृती हरवत चालली आहे.. आपण नवरात्रीत नऊ रंगांच्या साड्या, कपडे परिधान करतो, मात्र याचं मूळ कारण समजून घेतलं तर तुमच्या जीवनात नक्कीच बदल घडेल. याला मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेणे अत्यंत गरजेचं राहील, असे प्रतिपादन डॉ. कांचन नारखेडे यांनी केले. लोकशाहीच्या कार्यालयात नवरात्रीनिमित्त जागर संस्कृतीचा या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे., त्यावेळी त्या बोलत होत्या.

त्यापुढे म्हणाल्या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नऊ देव्यांची पूजा केली जाते. या नऊ देव्यांचं मानसशास्त्रीय विश्लेषण आपण समजून घेणे अत्यंत गरजेचं राहील. प्रत्येक स्त्रीने हे समजून घेतलं आणि त्याला अंगीकारलं तर त्यांच्या आयुष्यात नक्कीच बदल घडेल. पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा होते. या दिवशी नारंगी रंग असतो. हे ऊर्जेचे प्रतीक आहे. पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी ही स्त्रीच्या बालपणाच आणि तिच्यातल्या ऊर्जेचे प्रतिनिधित्व करते. स्त्रीच्या ऊर्जेला प्रभावित करते. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा होते. या देवीचा पांढरा असतो. हा आदरयुक्त रंग आहे. त्याचप्रमाणे ही देवी संभाषणाची उपयुक्तता स्पष्ट करते. कोणतेही नात्याला सुदृढ करण्यासाठी संवाद हा अत्यंत आवश्यक असतो. त्या संवादातूनच पुढील सर्व गोष्टी शक्य होत असतात.

तिसऱ्या दिवशी चंद्रगंधा या देवीची पूजा केली जाते. या देवीचा लाल रंग असतो. लाल रंग हा शूरतेचे प्रतीक आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर समस्या निवारणासाठी शूरतेची म्हणजेच हिम्मत असण्याची गरज असते. प्रत्येक गोष्टीवर तोडगा हा निघतोच, मात्र जर तुम्ही हिम्मत ठेवली आणि हिमतीने परिस्थितीचा सामना केला तर कोणत्याही गोष्टीवर तोडगा हा  निघतोच. चौथ्या दिवशी कुशमंदा या देवीची पूजा होते. त्या देवीचा गडद निळा रंग असतो. हा रंग क्रिएटिव्ह म्हणजे कलात्मकतेसाठी प्रोत्साहित करतो. स्त्रीमध्ये असलेल्या कलात्मक आणि क्रिएटिव गोष्टींना जागृत करण्यासाठी या देवीचं मानसशास्त्रीय महत्त्व लक्षात घेता येते.

पाचव्या दिवशी स्कंदमाता या देवीची पूजा होते. या देवीचा पिवळा रंग असतो. यातून स्त्रीमध्ये असलेल्या मवाळतेची जाणीव करून दिली जाते. ती प्रसंगी कठोर असते, मात्र तिच्यातले ममत्व, प्रेमळपणा हा देखील तितकाच महत्त्वाचा असतो. सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. या देवीचा हिरवा रंग असतो. हिरवा रंग हे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून शांततेचे प्रतीक आहे. शांतता म्हणजे आंतरिक शोधासाठी आवश्यक असलेली शांतता. यामध्ये स्वतःच्या गुणवत्तांचा शोध घेऊन मनशांती निर्माण करण्यासाठी ही देवी प्रोत्साहित करते. यातूनच स्त्रीच्या नवनिर्मितीची प्रेरणा जागृत होत असते. मनातील वाईट विचारांना शांत करून सकारात्मकतेची जाणीव करून देते.

सातव्या दिवशी कालरात्री या देवीची पूजा होते. त्या देवीचा राखाडी रंग असतो. ही देवी जोखीम स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करते. तसेच ही देवी डिस्ट्रॉय करण्याला म्हणजे एखाद्या गोष्टीला संपवण्याचे प्रतिनिधित्व करते. म्हणजे एखाद्या गोष्टीला संपवण्याचे धाडस तिच्यामध्ये असतं. समोर आलेल्या प्रत्येक नकारात्मकता, क्रूरता असाह्यता आणि अहंपणाला संपवण्यासाठी ही देवी प्रोत्साहित करत असते. ती उर्जा प्रदान करून स्त्रीला बळ देते.

 

आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा होते. या देवीचा जांभळा रंग असतो. ही देवी अपेक्षा निर्मितीसाठी प्रोत्साहन देते. कोणतेही ताण-तणावावर आणि कोणत्याही समस्येवर अपेक्षा ठेवणे म्हणजे होपफुल राहणे हे सर्वात मोठं औषध असतं. त्यामुळे कधीही आशा सोडू नये. यासाठी ही देवी प्रोत्साहित करते. आशेवरच सर्वकाही अवलंबून असतं. यातून बऱ्याचदा नकारात्मक विचार देखील टाळले जातात. या देवीच्या हातात अनेक शस्त्र आहेत. आणि त्याही अवस्थेत ती सकारात्मक भूमिकेसाठी अपेक्षित राहते. सर्व व्यवस्थित करण्याची तिची क्षमता ती दाखवून देते.

शेवटच्या दिवशी सिद्धीदात्री या देवीची पूजा केली जाते. या देवीचा रंग मोरपंखी असतो. ही देवी तुमच्यातील आंतरिक भरण पोषणावर अधिक प्रभाव पाडते. तुमच्यामध्ये संपालेल्या सकारात्मकतेला भरून काढण्यासाठी ही देवी प्रोत्साहित करते. ही तुमची हीलिंग पावर असते. त्यासाठी तुम्ही संगीत ऐकणे, निसर्गाच्या सानिध्यात फेरफटका किंवा इतर मनःशांतीसाठी लागणाऱ्या गोष्टींचा विचार करू शकतात. यातून मन शांत राहण्याला फायदा होतो. आणि बळ मिळते.

अशा पद्धतीने मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून या नवरात्रीच्या नऊ रंगांचा आणि नऊ देवांचा विचार केला, तर प्रत्येक स्त्रीच्या जीवनात अनेक चांगले बदल घडून येतील. बऱ्याचदा कठीण वाटणाऱ्या गोष्टी सोप्या होतील. नवरात्रीच्या निमित्ताने मी सर्व स्त्रियांसाठी या सर्व गोष्टी आत्मसात करण्याचं आवाहन करते. या पद्धतीने जर आपण स्त्रियांनी आपल्या विचारांना आणि जीवन जगण्याला दिशा दिली, तर अनेक गोष्टी साध्य होतील. अशा पद्धतीने या सणांचा विचार मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून करण हे अत्यंत गरजेचे आहे. जुन्या विचारांना अशाप्रकारे आधुनिकतेची जोड देऊन आपण अनेक नवनवीन बदल स्वीकारू शकतो जे आपल्या आयुष्यासाठी प्रभावी ठरतील, असे मार्गदर्शन डॉ. कांचन नारखेडे यांनी केले.

 

शब्दांकन

राहुल पवार

 

Leave A Reply

Your email address will not be published.