नवाविध भक्ति व नवरात्र – वंदन

0

भाग्यरेखा पाटोळे लिखित नवरात्री विशेष लेख

समर्थ रामदास स्वामी यांनी ‘दासबोध’ या ग्रंथात दशकात सहावी भक्तीमार्गातील पायरी म्हणून ‘वंदन’ उल्लेख केला आहे. ही भक्ती विशेष सायास किंवा कष्ट नसलेली व सोपी अशी आहे. श्रद्धापूर्वक व मनःपूर्वक केलेला नमस्कार परिपूर्ण ठरतो व आशिर्वाद देऊन जातो समर्थ म्हणतात,

“सहावी भक्ती ते वंदन करावे देवासी नमन”

“संत साधू आणि सज्जन । नमस्कारीत जावे.”

नित्यनेमाने मारुती, सूर्य गभस्ती यानांही, वंदन करावे. तसेच श्रीपति, पशुपती, अगस्ती यांनाही नमस्कार करावा. वेदज्ञ, शास्त्रज्ञ, पंडित, पुराणिक,  ज्यांच्याठायी विशेष गुण आहे तिथे नमस्कार अवश्य करावा. नमस्काराने अंगी नम्रता येते. विकल्प नाहीसे होतात व सख्य जडते.

“नमस्कारा ऐसें नाही सोपें”

“नमस्कार करावा अनन्य रूपे”

“नाना साधनी साक्षेपे”

“कासया सिणावे”

नवरात्रात आपण देवीमहात्म्य ऐकतो, देवी अर्थवशीर्ष म्हणतो, सप्तशतीचे पाठ करतो. श्रीसुक्त पठण करतो त्याची आर्वतन करतो. पण हे सारे श्रवण- भजन-पूजन करूनही आपण देवीचे सगुण-साकार रुपडे पहायला जातोच. – कधी आपण तुळजापूरला जातो, कोणी माहूरला जातो. कोणी कोल्हपूरी अंबामातेचे दर्शन घेतो. कुणी वणीची सप्तश्रृंगीला जाऊन दर्शन घेतात. वंदनातच मोडणारा प्रकार म्हणजे साष्टांग नमस्कार. आपण कुलदेवतेला लोटांगण घालतो. ती जर दूर असेल तर जाणे शक्य नसेल तर मनोभावे आपण तिची आळवणी करतो व म्हणतो,

 “दंडवत सांगा माझा दंडवत सांगा.”

“तुळजापूर भवानीला दंडवत सांगा.”

“कोल्हापूरचा अंबामातेला दंडवत सांगा “

असं पुनः पुनः विनवतो. हे, वंदन कधी आदरयुक्त भितीने घडते, कधी सप्रेम भावाने घडले. पण हे वंदन आपण करतोच कारण आपल्याला ठाऊक असते की देवीच्याच  कृपेमुळे आपला संसार चालू आहे व तिचे कृपाछत्र कायम आपल्यावर हवे आहे. आज पष्ठीचा दिवस आहे. आज मोठ्या भक्ती भावाने व श्रद्धेने आपण तिच्या दारात गोंधळ घालणार आहोत. हातात दिवट्या घेऊन ‘उदे गं अंबे उदे’ असा नामघोष करतो.

“कवडि एक अर्पिता देसी हार मुक्तफळा हो | “

सगळ्या भक्तावर प्रसन्न होते. सर्व कुळाचा ती उध्दार करत. आपले चित्त मात्र मातेच्या समचरणाशी रहायला हवे. यासाठी तिचीच कृपा हवी ज्ञानराज माऊली म्हणतात,

“उजळ कुळ  दीपा  ।बोध करा सोपा ||”

“येऊनी लवलाही, येऊनी लवलाही तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा ।” 

तुला वंदन करिता करिता बोध सोपा होऊ दे व यासाठी तुझे सहाय्य हवे. तू लवकर ये तू लवकर ये. साडी-चोळी-खण-नारळाने मी तुझी ओटी तुला वंदन करून संपन्न केली आहे. आद्य शंकराचार्यानी भवानी अष्टकांत जे उद्घोषित केले आहे ते त्रिवार सत्य आहे.

“न ताता न माता न बन्धुन दाता”

“न पुत्रौ न पुत्री न भृत्यो न भर्ता ।”

“न जाया न विद्यः वृतिर्ममैव”

“गतिस्तवं मतिस्वं त्वमेका भवानि ।”

आपला स्वतः चा देह, प्रतिष्ठा, पैसा, आप्त स्वकीय, केलेला लोकसंग्रह याला मर्यादा आहेत. एका विशिष्ट मर्यादेत ते सहाय्यभूत होतात. पण खरी वस्तुस्थिती आद्य शंकराचार्यांनी सांगितली तशीच आहे.

॥ उदे ग अंबे उदे II  

II उदे ग अंबे उदे ।।

 

भाग्यरेखा पाटोळे

कोथरूड, पुणे

मो. 8412926269

Leave A Reply

Your email address will not be published.