10 रुपयांच्या नाण्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम?; केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

नाशिक : दहा रुपयाच्या नाण्यांबाबत सोशल मीडियातून चुकीची माहिती काही पसरवली जात असल्याने व्यापारी, दुकानदार यांसह सामान्य नागरिकांमध्येही संभ्रम निर्माण झाल्यामुळे १० रुपयांची सर्व नाणी स्वीकारायलाच हवीत, असे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांनी सभागृहात दिले आहे. मात्र नाशिक शहरात दहा रुपयाच्या नाण्यांचा दैनंदिन व्यवहारांमधील वापर सुरळीत असून कोणीही दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार देत नसल्याचे शहरातील किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले.

दहाचे नाणे नाकारू शकत नाही

नाशिक शहरात दहाचे नाणे कोणीही नाकारत नाही. मात्र केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दहा रुपयांचे नाणे सर्वांनी स्वीकारायलाच हवे. ते कोणीही नाकारू शकत नाही, असे स्पष्टीकरण सभागृहात दिल्यानंतर मात्र या नाण्यांविषयी वेगेवेगळ्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत.

दहाचे नाणे हे घेतात

भाजी बाजार, किरणा दुकान, दूधवाला, चहावाला, पेपरवाला यासह फेरीवाले व विविध प्रकारचे किरकोळ विक्रेते दहाचे नाणे कोणत्याही अडकाठीशिवाय स्वीकारत आहेत. शहरातील मेनरोड, दहीपूल, दूधबाजार, फूलबाजार परिसरासह इंदिरानगर, सिडको, सातपूर, पंचवटी, आडगाव आदी विविध भागांतील बाजारपेठांमध्येही दहाचे नाणे सहज स्वीकारले जाते.

दहाचे नाणे हे नाकारतात

बहुतेकदा काही ग्राहक चिल्लर सांभाळायला अडचण नको म्हणून दहाचे नाणे स्वीकारत नाहीत. तरुण पिढीला तर दहाचे नाणे खिशात ठेवणेच अडचणीचे वाटते, त्यामुळे अपवादात्मक परिस्थितीत केवळ नाणे सांभाळण्याची गैरसोय टाळण्यासाठी काही जण दहा रुपयाचे नाणे नाकारून नोटेची मागणी करताना दिसतात.

काही पतसंस्था, सहकारी बँकांमध्ये केवळ हाताळणीच्या कारणामुळे नाणे स्वीकारण्यास नकार दिला जात असल्याचे दिसून येते. असे असले तरी राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये सर्व प्रकारची नाणी स्वीकारली जातात.

दहा रुपयांच्या नाण्यांसह चलनातील सर्वच नाण्यांचे व्यवहार सुरळीत सुरू आहेत. अशा नाण्यांच्या जवळपास एक ते दीड लाख रुपयांच्या रकमेची बँकेत रोज देवाणघेवाण होत असते. दहा रुपयांचे नाणे हे भारतीय चलन असून ते कोणालाही नाकारता येत नाही.

– उज्ज्वल खैरनार, कॅश ऑफिसर, एसबीआय, मुख्य शाखा, नाशिक

 

Leave A Reply

Your email address will not be published.