डॉ.सुवर्णा वाजे मृत्यू प्रकरण; सॅनिटायझरने केली जाळून हत्या

0

लोकशाही न्युज नेटवर्क 

 

नाशिक: मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा वाजे यांची हत्या क्लिनिकमधील व संदीप वाजे याने कोरोना काळात जमविलेल्या सॅनिटायजरने आग लावून करण्यात आल्याची शक्यता निर्माण झाली आहे. या हत्या प्रकरणाचा सूत्रधार संदीप वाजेचा मावसभाऊ यशवंत म्हसके याने न्यायालयात संदीप वाजेला अशा प्रकारे सॅनिटायझरचा वापर करण्याचा सल्ला दिल्याचे कबूल केल्याने, ही शक्यता बळावली असून, या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी म्हस्केची आणखी ६ दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा वाजे यांची हत्या नसून, ती आत्महत्या असल्याचा बनाव संशयित संदीप वाजे व त्याचा मावसभाऊ असलेला संशयित बाळासाहेब उर्फ यशवंत रामचंद्र म्हस्के यांनी संगनमताने केल्याचा संशय नाशिक ग्रामीण पोलिसांना निर्माण झाल्याने, पोलिसांनी दोघांचा मोबाइल संवाद व घटनेच्या दिवशी दोघांमध्ये झालेले तब्बल १२ ते १४ फोन कॉल, यावरून वाजे हत्याकांडात म्हस्केचा महत्त्वाचा सहभाग असल्याने, पोलिसांनी त्यास अटक केली आहे. त्याला न्यायालयाने अधिक तपासासाठी बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

ही मुदत संपल्याने पोलिसांनी म्हस्केला बुधवारी पुन्हा न्यायालयात हजर केले. यावेळी म्हस्के याने न्यायालयासमोर संदीप वाजेला डॉ.सुवर्णा वाजे यांची हत्या करण्यासाठी सॅनिटायजरचा वापर करण्याचा सल्ला दिल्याची कबुली दिल्याचे सरकारी वकील जयदेव रिके यांनी दिली. त्यामुळे आता डॉ.सुवर्णा वाजे यांना सॅनिटायजरचा वापर वाहनासह करून, जिवंत जाळण्यात आले की, त्यांची हत्या करून वाहनाला आग लावण्यात आली.

याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. या तपासासाठी पोलिसांना यशवंत म्हस्के याची आणखी ६ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यामुळे पुढील आठवडाभराच्या कालावधीत पोलिसांच्या तपासातून डॉ.सुवर्णा वाजे हत्या प्रकरणाचे गूढ उकलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सॅनिटायझर कॅनही जप्त

डॉ.सुवर्णा वाजे हत्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख संशयित आरोपी संदीप वाजे याचा मावसभाऊ यशवंत स्हस्के याला अटक केल्यानंतर, त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सॅनिटायझरची कॅन जप्त केली आहे. संदीप वाजे याने कोरोनाच्या काळापासूनच हे कृत्य पूर्णत्वास नेण्यापासून सॅनिटायझरचा साठा केला होता. त्यातीलच काही सॅनिटायझरचा वापर संदीप वाजे याने डॉ.सुवर्णा वाजे यांना जाळण्यासाठी केल्याची शक्यता यशवंत म्हस्केच्या जबाबावरून निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.