तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी I

0

II करुणाष्टक- 7 II

तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी I
शिणत शिणत पोटी लागली आस तुझी II
झडकरी झड घाली धांव पंचानना रे I
तुजविण मज नेते जंबुकी वासना रेII

जोपर्यंत आपल्याला अन्य गोष्टींचा आश्रय वाटतो तोपर्यंत भगवंताचा अनन्य आश्रय लाभत नाही. धनाचा, मानाचा, कुटुंबियांचा, शरीराचा आधार वाटण हे स्वाभाविक असते. पण तरीही ‘तो रामरायाच एक मला तारणार आहे’ असे वाटले पाहिजे. भवपाशातुन मुक्त करणारा आहे. म्हणून समर्थ म्हणतात, “तुजविण करुणा” त्याची अग्यम लीला त्यांना ठाऊक होते व तोच करुणेचा सागर दीनवत्सल, भक्तवत्सल आहे याची प्रचितीही होती. जननीच्या जठरातही त्यानेच आपले पंचप्राण पोसले होते व बाहेर येतात मातेचे दूधही त्याने निर्माण केले होते. मग मी आता व्यर्थ कोणती चिंता करावी? वृथा अभिमान तरी का बाळगावा? एक भगवंत आधार असताना इतर लोकांकडे जनाकडे मी काय मागावे? देवापाशी अवघे सामर्थ्य आहे, मग इतरांशी व्यर्थ आटापिटा का करावा? ज्याच्याकडे मागणे मागायचे आहे तो आपल्यापेक्षा समर्थ नको का? माझ्या या रामरायाने राक्षसांचे कंदन केले आहे.

कुंभकर्णाचे विदारण केलंय. रावणाचे मर्दन केले आहे व वानरांना जीवन दिले आहे. विभिषणाला राजपद दिलंय. शूर्पणखाचे विटंबन केलं आहे. ताटिका मर्दन सुबाहुच्छेदन केलंय. अशी ही लिला करणारा रामराया आपल्या भक्तांसाठी खूप औदार्यशील आहे. त्याने जटायूला पावन केले, शबरीचे पूजन केले, सुग्रीव चा तो प्रियकर ठरला, हनुमंताचा तो जीवन ठरला, अंगदाचे पालन केले, ताराचे बोधन केले, सर्व वनचरांचा तो मित्र झाला. असा षड्गुण ऐश्वर्य संपन्न श्रीराम माझी करूणा जाणेल. माझ्यासारख्या भक्तांचे तो भूषण ठरेल. या दासाचे तो रक्षण करेल आणि म्हणूनच त्याच्या चरणाशी हा दास अंकित झालेला आहे. त्यांची प्रतिज्ञा आहे की, तो रामराया शिवाय एक क्षणभरही राहू शकणार नाही.

“या पुनरपि जननं पुनरपि मरणं” अशा संसार चक्रात अडकवून मला तु त्रस्त करू नकोस. मी शिणलो आहे. थकलो आहे. तू कृपा कर जन्म झाल्यापासून शारीरिक, मानसिक छोटे-मोठे आघात होत राहतात. सुख ही मिळते पण ते जवा एवढे, दुःखाचे प्रमाण अधिक अशी स्थिती असते. म्हणून तू जसा आनंदाचा धाम आहे, सच्चिदानंद आहेस तसा अव्यंग कुठलीही उणीव नाही, न्यून नाही. अशा पूर्णत्व लाभलेल्या निजधामाची प्राप्ती मला होऊ दे व पुनरपि संसाराला येण्याची वेळ नको. म्हणून तो धावत ये. विलंब करू नकोस.

“झडकरी झड घालीं धाव पंचानना रे I” हे सर्वश्रेष्ठ ब्रह्मा या जगताची उत्पत्ती, स्थिती, लय सारे तुझ्याच हातात आहे. नाही का? अशा सर्व सत्ताधीशा तूच मला सोडव. मला सद्बुद्धी दे. कशासाठी तर या भक्तिमार्गावरची पाऊले द्रुतगतीने पडण्यासाठी.

” झड झडोनी रिघ. इया भक्तीच्या वाटे लाग” असा कुठलाही पाश, आसक्ती किंचितही न राहता मी सरळ तुझ्याकडे यावे. तू माझ्याकडे दुर्लक्ष केलं तर काय सांगावं या वासना मला पुन्हा संसार चक्रात अडकवशील म्हणून तू आता उडीच घाल व भवसागरातून सोडव. आणि तू जर हे केले नाहीस तर माझी स्थिती इतकी केविलवाणी होईल त्या स्थितीचे वर्णन मी काय करू?

इसापनितीतील पशु पक्ष्यांच्या गोष्टी म्हणजे सहज सोप्या भाषेतील जीवनातील तत्वज्ञान सांगून जाणाऱ्या गोष्टी. कोल्हा आणि आंबट द्राक्षे ही गोष्ट परिचयाचीच. उंच वेलीवर असणारी द्राक्षे मधुर गोड अमृतासारखी पण कोल्हा काही इतकी उंच उडी घेऊ शकत नाही व तो स्वतःची समजूत काढतो की, ‘द्राक्ष आंबट आहेत बरी झाली नाही खाता आली ती’ मनुष्यप्राणी असाच आहे. कुठं नामस्मरण करायचं? ध्यानधारणा करायची? कधी तो परमात्मा भेटणार? बरं आमचं नाम घेऊन काय व्हिसा पासपोर्टचे काम झटपट होणार आहे का? नाही ना? मग तो प्रभू भेटीसाठी काही करायला तयारच होत नाही. कारण एकतर अदृश्य असा परमात्मा व त्याच्या प्राप्तीन मिळणारी सुख, समाधान, शांती, तृप्ती, आनंद ही फळे सगळ्यांनाच थोडी हवी असतात? व पुन्हा या मार्गावरून धैर्यवान मंडळीच जाऊ शकतात. कारण जे फळ इथे मिळते ते दिर्घकाळानंतर, या पथावर महेश अजून चालत आहे. नित्य नियमाने, सद्भावनेने, प्रेमाने वर्षानुवर्षे साधने करावी लागते. अर्थात मग मिळणारे फळ हे अवीट व अमृतमय असणारच. सुंदर सीडलेस नाशिकच्या द्राक्षांसारखे.

म्हणून समर्थ म्हणतात मला नकळत अडकवून ठेवशील. आपल्यासारख्या सुशिक्षित, समंजस, बुद्धिवान मंडळींनीही आपण द्राक्षांपासून, त्याच्या आस्वादापासून दुर राहात नाही ना? याचा विचार करावा.

II जय जय रघुवीर समर्थ II

लेखिका- भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.