महिला वैद्यकीय अधिकारी मृत्यू प्रकरण गूढ कायम

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

 नाशिक :महिला वैद्यकीय अधिकारी मृत्यू प्रकरण  गूढ कायम. सिडको येथील महापालिकेच्या स्वामी समर्थ रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी सुवर्णा संदीप वाजे (३८) या मंगळवारपासून (दि.२५) घरी परतल्याच नाही. तसेच त्यांची मोटार विल्होळीच्या पुढे निर्जनस्थळी वाडीवऱ्हे पोलिसांना आगीमध्ये भस्मसात झालेल्या अवस्थेत दोन दिवसांपूर्वी रात्री आढळून आली.

विशेष म्हणजे या मोटारीतून पोलिसांनी जळालेल्या अवस्थेतील मानवी हाडेही जप्त केल्याने मोटारीत नेमका कोणाचा मृतदेह जळाला, याबाबतचे गूढ वाढले आहे. ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी तपासाला गती दिली आहे. डॉ. सुवर्णा यांच्या संदर्भात ही दुर्घटना घडली असल्याची चर्चा असली तरी पोलिसांनी मात्र अधिकृतरीत्या स्पष्ट केलेले नाही. डीएनए चाचणीनंतरच मृतदेह कोणाचा ते स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.

गोविंदनगर येथील गुरुदेव प्राइड अपार्टमेंटच्या तिसऱ्या क्रमांकाच्या सदनिकेत कुटुंबीयांसोबत सुवर्णा वाजे वास्तव्यास होत्या. मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वाजे त्यांच्या sh andमारुती सुझुकी रिटझ कारने (क्र. एमएच १५ डीसी ३८३२) रुग्णालयात गेल्या. रात्री ९ वाजेपर्यंतदेखील त्या घरी परतल्या नाही, म्हणून त्यांचे पती संदीप वाजे यांनी त्यांना मोबाइलवर मेसेज केला असता त्यांनी ‘मी कामात आहे, वेळ लागेल’ असे उत्तर मेसेजद्वारे दिले.

त्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा त्यांनी फोन केला असता वाजे यांचा मोबाइल बंद आल्याचे अंबड पोलीस ठाण्यात त्यांनी दिलेल्या खबरमध्ये म्हटले आहे. रात्री उशिरापर्यंत शाेध घेतला असता त्यांचा पत्ता लागला नाही, म्हणून संदीप वाजे यांनी मंगळवारी मध्यरात्री अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्याच रात्री वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याला विल्होळीच्या पुढे लष्करी हद्दीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका मोटारीला आग लागल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ धाव घेतली असता मोटार पूर्णपणे जळून गेलेली आढळली. यावेळी मोटारीत एका मानवी मृतदेह जळाल्याचेही पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहे. यावरून आता पोलिसांनी पुढे तपासाला गती दिली आहे. याप्रकरणी वाडीवऱ्हे पेालीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.