मोदींकडून अण्णांची चौकशी, तब्येती बाबत केली विचारपूस

0

अहमदनगर – लोकशाही न्युज नेटवर्क
नगर दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या निवडक पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. या दरम्यान काँग्रेसमधून भाजपमध्ये नव्याने आलेले विनायक देशमुख यांचीही मोदींशी भेट झाली. देशमुख हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे भाचे आहेत. हे समजताच मोदींनी हजारे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांना सांगा काळजी घ्या, काही गरज पडली तर आमच्या कार्यालयात फोन करा, असा निरोप मोदींनी देशमुख यांच्याकडे दिला. देशमुख यांनी हजारे यांना याबाबत माहिती दिल्यावर हजारे यांनी मोदींचे आभार मानले. देशमुख यांनीच या भेटीची आणि झालेल्या चर्चेची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या सभेनंतर व्यासपीठाच्या मागील बाजूस निवडक पदाधिकाऱ्यांच्या भेटीची व्यवस्था करण्यात आली होती. देशमुख यांची भेट होताच, त्यांनी हजारे यांचा संदर्भ दिला. त्यावर मोदी म्हणाले, अण्णांची तब्येत कशी आहे. त्यांना माझा नमस्कार सांगा. तब्येतीची काळजी घ्यायला सांगता. काही गरज पडली तर माझ्याशी किंवा आमच्या कार्यालयाशी संपर्क करायला सांगा, असेही मोदी म्हणाले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली सरकारमधील मद्य धोरणातील गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आली आहे. केजरीवाल पूर्वी हजारे यांच्या आंदोलनात होते. ते अण्णांचे शिष्यही मानले जात होते. या प्रकरणात केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर हजारे यांनी दिलेली प्रतिक्रिया केंद्र सरकारला पूरक ठरणारी होती. हजारे म्हणाले होते. माझा दारूला नेहमीच विरोध होता. पण केजरीवाल यांनी ऐकले नाही. शेवटी त्यांनी मद्यविक्री धोरण जारी केले. शेवटी त्याच मद्यनीतीमुळे त्याला अटक झाली. त्यामुळे आता तो आणि सरकार बघून घेतील. ज्यांची चूक झाली त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे. असे त्यावेळी हजारे म्हणाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.