नागपंचमीच्या दिवशी चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

श्रावणमास म्हणजे सणांचा मास (महिना) असेही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. श्रावणातील पहिला सण ‘नागपंचमी’ ! या दिवशी स्त्रिया उपवास करतात. नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात.  नागपंचमी हा सण श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी काही चिरणे, कापणे वर्ज्य असते. या सर्व गोष्टींमागील इतिहास आणि शास्त्र जाणून घेऊया.

 इतिहास

सर्पयज्ञ करणार्‍या जनमेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले. जनमेजयाने ‘वर मागा’, असे म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर त्यांनी मागून घेतला. जनमेजयाने सर्पयज्ञ थांबवला, तो दिवस पंचमीचा होता. शेषनाग त्याच्या फण्यावर पृथ्वी धारण करतो. तो पाताळात राहातो. त्याला सहस्र फणे आहेत. प्रत्येक फण्यावर एक हिरा आहे. त्याची उत्पत्ती श्रीविष्णूच्या तमोगुणापासून झाली, असे म्हटले जाते. श्रीविष्णु प्रत्येक कल्पाच्या अंती महासागरात शेषासनावर शयन करतो. त्रेतायुगात श्रीविष्णूने रामाचा अवतार घेतला. तेव्हा शेषाने लक्ष्मणाचा अवतार घेतला. द्वापर आणि कली या युगांच्या संधीकाळात कृष्णाचा अवतार झाला. त्या वेळी शेष बलराम झाला.

श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. पाच युगांपूर्वी सत्येश्‍वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्‍वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्‍वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्‍वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते.

नागपूजनाचे महत्त्व

अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम् ।

शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं, कालियं तथा ।।

अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया अशा नऊ जातींच्या नागांची आराधना करतात. त्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होत नाही.

नाग हा परमेश्वराच्या अवतारांशी, म्हणजेच सगुण रूपांशी संबंधित आहे. सागरमंथनासाठी कूर्मावताराला वासुकी या नागाने साहाय्य केले होते. श्रीविष्णूच्या तमोगुणातून शेषनागाची निर्मिती झाली. भगवान शंकराच्या अंगावर नऊ नाग आहेत इत्यादी. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागाचे पूजन करणे, म्हणजे नऊ नागांच्या संघाच्या एका प्रतिकाचे पूजन करणे होय.

नागपंचमीच्या दिवशी या बाबी लक्षात ठेवा

ज्या जातकांच्या कुंडलीत राहू-केतू ग्रह अशुभ स्थितीत आहेत, त्यांनी कधीही नागांना त्रास देण्याची चूक करू नये. त्यापेक्षा नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेच्या मूर्तीला दुधाने अभिषेक करून आपल्या कर्माची क्षमा मागावी. या जन्मी किंवा मागील जन्मी साप मारले गेले असतील किंवा काही इजा झाली असेल तर त्याबद्दल क्षमा करा अशी प्रार्थना करा.

नागपंचमीच्या दिवशी कधीही जमीन खोदू नका किंवा नांगरणी करू नका. विशेषत: ज्या ठिकाणी सापाचा वावर किंवा बिळ आहेत त्या ठिकाणी जमीन खणू नका.

सापांना कधीही मारू नका किंवा त्यांना इजा करू नका. त्यांना पकडून जंगलात सोडून द्या.

नागपंचमीच्या दिवशी सुईधाग्याचा वापर करू नये.

नागपंचमीच्या दिवशी लोखंडाच्या भांड्यामध्ये जेवण तयार करू नये.

धार्मिक शास्त्रावरील सामाजिक मान्यतेनुसार नागपंचमीच्या दिवशी हिरव्या भाज्या तोडू नयेत. असे करणे अशुभ मानले जाते.

नागपंचमीच्या दिवशीही झाडे तोडण्यास मनाई आहे.

नागपंचमीच्या दिवशी एकट्याने नागदेवतेची पूजा करू नये. पूजा करताना नागदेवतेसोबत शिवाची पूजाही आवश्यक आहे.

असे मानले जाते की, नागपंचमीच्या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते आणि या दिवशी काही कामे करण्यास मनाई आहे. तुम्हीही नागपंचमीची पूजा करत असाल तर या चुका करू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.