MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! वाचा आयोगाचा निर्णय

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

MPSC ची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षा विविध पदांसाठी स्वतंत्र घेण्यात येत होत्या. मात्र आता MPSC ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आयोगाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पध्दतीमध्ये सुधारणा (MPSC changed Exam Process of prelims & Mains Exams) करण्याचा निर्णय आयोगातर्फे घेण्यात आला आहे. त्यानुसार आता काही महत्त्वाचे बदल हे परीक्षेच्या पद्धतींमध्ये करण्यात आले आहेत. स्पर्धा परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या सर्व राजपत्रित गट-अ आणि गट-ब संवर्गाकरीता यापुढे पारंपारिक/वर्णनात्मक स्वरूपाच्या मुख्य परीक्षेच्या आधारे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

राज्यसेवेसह सर्व राजपत्रित गट-अ आणि गट-ब संवर्गातील पदभरतीसाठी एकच प्रिलिम्स परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हणजेच दोन्ही पदभरतींसाठी एकच प्रिलिम्स असणार आहे. मात्र मेन्स परीक्षा स्वतंत्र पद्धतीनं घेतल्या जाणार आहेत.

उमेदवारांकडून अर्ज स्वीकारताना सर्व जाहिरात केलेल्या संवर्गासाठी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा गुणवत्तेच्या आधारे कॅडरचा पर्याय घेतला जाईल. तसेच संबंधित संवर्गासाठी उमेदवाराने दिलेला पर्याय हा संबंधित संवर्गातील पदासाठीचे अर्ज मानले जातील आणि त्यानुसार ते भरले जातील. पदांच्या संख्येच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांची संख्या निश्चित करून संवर्गासाठी पूर्वपरीक्षेचा स्वतंत्र निकाल जाहीर केला जाईल.

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्‍त पूर्व परीक्षेच्या निकालाधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता संबंधित संवर्गासाठी निश्‍चित करण्यात येणाऱ्या स्वतंत्र परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षा घेण्यात येईल.

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्‍त पूर्व परीक्षेच्या निकालाधारे महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क मुख्य परीक्षा या मुख्य परीक्षांच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता संबंधित संवर्गासाठी निश्‍चित करण्यात येणाऱ्या स्वतंत्र परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षा घेण्यात येतील. हे महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. म्हणजे आता MPSC च्या फक्त दोनच पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहेत. मात्र या पूर्व परीक्षांच्या आधारावर निरनिराळ्या विभागांमध्ये अप्लाय करू इच्छिणाऱ्या आणि प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहेत.

राजपत्रित गट अ आणि ब च्या सर्व मुख्य परीक्षा या लेखी असणार आहेत. तर अराजपत्रित गट ब आणि क च्या सर्व मुख्य परीक्षा या MCQ मध्ये असणार आहेत.

निर्णयामागचं कारण 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासन सेवेतील विविध संवर्गाकरीता राबविण्यात येणाऱ्या विद्यमान भरतीप्रक्रियेमुळे परीक्षांची वाढलेली संख्या, उमेदवार व प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण, भरती प्रक्रियेस होणारा विलंब, गुणवत्ता राखण्यासाठी सतत करावे लागणारे प्रयत्न, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन करावयाच्या विविध उपाययोजना, भविष्यामधील भरतीप्रक्रियेचे नियोजन या व इतर अनुषंगिक बाबींचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे असं MPSC नं स्पष्ट केलं आहे. सदर बदल 2023 मधील परीक्षांपासून लागु होतील अशीही माहिती MPSC नं दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.