जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
देशभरात उत्साहाचे वातावरण असतांना एक धक्कादायक घटना ऐरोली शहरात घडली आहे. आपल्या बहिणींना दारूच्या नशेत माहेर करणाऱ्या तरुणाचा बहिणीच्या मारहाणीत मृत्यू झाला असून, याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात एका बहिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिलांच्या निधनाच्या दहा दिवसातच कुटुंबात हा प्रकार घडला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी ऐरोली येथे राजनच्या शैलेश सोरटे (३४) याच्या मृत्यूची घटना घडली होती. त्याला दारूचे व्यसन असल्याने दारूच्या नशेत पडून मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. परंतु बहिणीच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यानुसार एका बहिणीवर सोमवारी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेश हा व्यसनी असून तो दारूच्या नशेत घरी येऊन तीन बहिणींना मारहाण करत असे. ११ नोव्हेंबरला रात्री शैलेश हा दारूच्या नशेत घरी येऊन वडिलांच्या फोटोपुढे नॉनव्हेज जेवणाचा नैवैद्य ठेवण्याचा हट्ट करू लागला होता. यामुळे घरात भांडण झाले असता मध्यस्ती करण्यासाठी आलेल्या करण्यासाठी आलेल्या ७० वर्षीय आईला शैलेशने कानाखाली मारली होती.
यामुळे तिन्ही बहिणींनी मिळून शैलेशला घराबाहेर काढले होते. परंतु नातेवाईकांच्या मध्यस्थीनंतर पहाटे ३ च्या सुमारास त्याला परत घरात घेतले होते. यावेळी घरात आल्यानंतर त्याने पुन्हा तिन्ही बहिणींना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये ज्योती (३२) हिचा गाला तो आवळत असतांना तिने स्वतःच्या बचावासाठी लोखंडी चिमट्याने त्याच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर तो इतर दोन बहिणींचा गळा आवळत असताना पुन्हा तिने बहिणींच्या सुटकेसाठी शैलेशचा डोक्यात चिमटा मारला. यामध्ये जखमी झाल्यानंतर तो शांत झाला असता तो झोपला आहे असे समजून तिन्ही बहिणी देखील झोपल्या होत्या. मात्र सकाळी तो अस्वस्थ असल्याचे समजताच बहिणींनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. यावेळी घाबरलेल्या बहिणींनी तो दारूच्या नशेत पडून जखमी झाल्याची माहिती पोलिसांना दिली होती. परंतु पोलिसांच्या चौकशीत भावा बहिणींच्या भांडणात त्याचा मृत्यू झाल्याचे उघड झाल्याने ज्योती सोरटे हिच्यावर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.